Raj Thackeray’s private doctor – राज्याच्या राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भाषण नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहते. काल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालानंतरचे पहिलेच भाषण केले. यामध्ये त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांच्या स्वत:च्या आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्दी खोकल्याचा उल्लेख करत डॉ. यादव यांच्याकडून औषध आणले, मग ते उद्धवलाही दिले, माझा खोकला अजून तसाच आहे, पण उद्धवचा दोन दिवसांत खोकला गेला, डॉक्टरांनीही पक्ष बदलला काय? असा मिश्किल उल्लेख केला आणि हे यादव डॉक्टर मराठी आहेत असेही सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांचे हे डॉक्टर (जनरल प्रॅक्टिशनर) दीपक यादव कोण याची उत्सुकता प्रचंड वाढली. आज नवाकाळ प्रतिनिधींनी या डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पण ते प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात. तरीही त्यांच्याशी संवाद साधत त्यांची माहिती मिळाली.
कोकणातील खेड येथील मराठी यादव कुटुंब 1940 च्या दशकात मुंबईत दादर परिसरात पश्चिमेला न.चि.केळकर मार्ग येथे स्थायिक झाले. तिथेच त्यांचा दवाखाना आहे. त्यांच्या पाच पिढ्या वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत. प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या वडिलांकडे उपचार घ्यायचे. 1985 मध्ये डॉ. दीपक यादव यांनी मेडिकल प्रॅक्टिसला सुरुवात केली. राज ठाकरे कुटुंब त्यांच्याकडे सुमारे 40 वर्षांपासून उपचार घेत आहेत. ते ठाकरे कुटुंबांचे फॅमिली डॉक्टर असल्याने त्यांच्याकडे श्रीकांत ठाकरे यांच्यापासून राज ठाकरे, त्यांची मुले अमित व उर्वशी ठाकरे, त्यांच्या आई कुंदा ठाकरे, बहीण जयजयवंती ठाकरेही उपचार घेतात. त्याचबरोबर उबाठा खासदार संजय राऊत देखील याच डॉक्टरांकडे उपचार घेतात.
—————————————————————————————————————————
हे देखील वाचा –









