Rajya Sabha Election 2026 : देशातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महाराष्ट्रातील ७ जागांचा यात समावेश आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता सत्ताधारी महायुतीचे सहा उमेदवार सहज निवडून येतील, असे चित्र आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवर कोणाला संधी द्यायची, यावरून महाविकास आघाडीमध्ये (मविआ) मोठ्या हालचालींना वेग आला आहे. या एका जागेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या दोन्ही पक्षांनी आपापले दावे मांडल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
आदित्य ठाकरे शिवसेनेच्या जागेसाठी आग्रही
शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची ही एकमेव जागा शिवसेनेला मिळावी, अशी आग्रही भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीच्या बळकटीसाठी आणि पक्षाच्या विस्तारासाठी ही संधी शिवसेनेला मिळणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत असून ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज विधानभवनात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या नावाचा राष्ट्रवादीकडून प्रस्ताव
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. “शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भूमिका आहे. जर शरद पवारांचे नाव पुढे आले, तर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांकडून त्याला विरोध होणार नाही आणि त्यांच्या नावावर सर्वांचे एकमत होईल,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे हे लवकरच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
सुप्रिया सुळे यांचा समन्वय आणि पाठपुरावा
खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील शरद पवारांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, “राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची हीच इच्छा आहे. मी स्वतः संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधला असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही दिल्लीत चर्चा करणार आहे. हा निर्णय एकमताने व्हावा, अशी आमची इच्छा आहे.” दरम्यान, शरद पवार यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, आगामी दोन-तीन दिवस ते मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. त्यांच्या प्रकृतीचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
निर्णायक बैठकीकडे सर्वांचे लक्ष
महाविकास आघाडीची आज विधानभवनात होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत केवळ राज्यसभेच्या उमेदवारीवरच नव्हे, तर बारामती लोकसभेच्या संभाव्य पोटनिवडणुकीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवार गट काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना शरद पवारांच्या नावावर राजी करण्यात यशस्वी ठरतो की आदित्य ठाकरे यांच्या आग्रहामुळे शिवसेनेला ही संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या निर्णयावर महाविकास आघाडीतील भविष्यातील समन्वयाची दिशा अवलंबून असेल.











