Rajya Sabha Election 2026 : भारतीय निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्व जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने महाराष्ट्रासह तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांतील जागांचा समावेश असल्याने देशाचे राजकीय वातावरण तापले आहे.
जागांचे समीकरण आणि संख्याबळ-
निवडणूक होत असलेल्या एकूण ३७ जागांपैकी सध्या १२ जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) वर्चस्व आहे, तर उर्वरित २५ जागा विरोधी पक्षांच्या ताब्यात आहेत. राज्यानुसार विचार केल्यास, महाराष्ट्रात सर्वाधिक ७ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये ६, तर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी ५ जागांसाठी मतदान होईल. या निवडणुकांमुळे वरिष्ठ सभागृहातील (राज्यसभा) सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या संख्याबळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ समाप्त-
येत्या २ एप्रिल २०२६ रोजी अनेक बड्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, तामिळनाडूतील कनिमोझी आणि तिरुची शिवा यांसारख्या प्रभावशाली खासदारांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांवर आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळते की हेच अनुभवी नेते पुन्हा सभागृहात परततात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय पेच आणि महत्त्व-
महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राज्याच्या राजकारणात अत्यंत कळीची ठरणार आहे. गेल्या काही काळातील राजकीय स्थित्यंतरांनंतर विधानसभेतील पक्षीय संख्याबळ मोठ्या प्रमाणावर बदलले आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत कोणाच्या गळ्यात टाकणार उमेदवारीची माळ? राहुल शेवाळेंचे नाव आघाडीवर-
आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आपल्या कोट्यातील एका जागेसाठी कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, दक्षिण मध्य मुंबईचे माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव या शर्यतीत सर्वात आघाडीवर असून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, पक्षांतर्गत इतरही अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
प्रमुख दावेदारांची नावे चर्चेत-
शिवसेनेच्या गोटातून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचे नाव प्रबळ असले तरी, पक्षातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांनीही आपली दावेदारी सादर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील नावांची चर्चा सुरू आहे:
संजय निरुपम: काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले आक्रमक नेते.
शायना एन.सी.: पक्षाचा महिला चेहरा आणि प्रदीर्घ अनुभव असलेल्या नेत्या.
ज्योती वाघमारे: पक्षातील एकनिष्ठ महिला पदाधिकारी.
गजानन कीर्तिकर: पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार कीर्तिकर यांनीही राज्यसभेवर जाण्याची आपली प्रबळ इच्छा पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली आहे.
संख्याबळ आणि राजकीय गणित-
विद्यमान विधानसभा सदस्यसंख्येनुसार, शिवसेना शिंदे गटाचा एक खासदार सहजपणे निवडून येऊ शकतो. विशेष म्हणजे, आपला उमेदवार निवडून आणल्यानंतरही शिंदे गटाकडे २० अतिरिक्त मते शिल्लक राहणार आहेत. या अतिरिक्त मतांचा वापर महायुतीमधील इतर घटक पक्षांच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे महायुतीची रणनीती अधिक भक्कम होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक–
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत वेगाने पार पडणार आहे:
अर्ज भरण्याची अंतिम मुदत: ५ मार्च २०२६
अर्जांची छाननी: ६ मार्च २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत: ९ मार्च २०२६
मतदान दिनांक: १६ मार्च २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)
मतमोजणी व निकाल: १६ मार्च २०२६ (सायंकाळी ५ वाजल्यापासून)
महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य पुढील प्रमाणे – (Retiring Rajya Sabha members from Maharashtra)
१. शरद पवार (श.प. गट)
२. रामदास आठवले (रिपाई)
३. फौजिया खान (श.प. गट)
४. रजनी पाटील (काँग्रेस)
५. प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
६. धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
७. भागवत कराड (भाजप)










