Tension in Ahilyanagar अहिल्यानगर शहरातील कोटला भागात मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रांगोळी काढल्याची घटना घडली. यामुळे संतप्त स्थानिक मुस्लीम समाजाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत रस्त्यावर उतरून छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर महामार्गावर (Tension in Ahilyanagar)रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या आंदोलकांवर लाठीमार केला. यामुळे परिसरात काही वेळ तणाव आणि गोंधळ निर्माण झाला होता. रांगोळी काढणार्या विटंबना करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर धर्मगुरूंच्या नावाची रांगोळी काढली होती. ही रांगोळी काही मुस्लीम समाजाच्या लोकांना आक्षेपार्ह वाटली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून रांगोळी काढणाऱ्यावर अटक करण्यात आली. यानंतर काही मुस्लीम समाजाच्या लोकांनी कोटला परिसरातील रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना रस्ता मोकळा करण्याची आणि शांतता पाळण्याची सूचना केली, पण ते तिथून गेले नाहीत. यावेळी आंदोलकांमधील काही लोकांनी दगडफेक सुरू केली, त्यावर पोलिसांनी बळाचा वापर केला. रस्त्यावर जमा झालेला जमाव पांगवला. काही लोकांनाही ताब्यात घेतले आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण करण्यामागे काही षडयंत्र आहे का, हे पाहावे लागेल. समाजात तेढ कोण निर्माण करत आहे, हेही पाहणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडविण्याचा प्रयत्न झाला होता. आताही त्याच प्रकारे कोणी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे का? प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे, परंतु अशा प्रकारे लोकांमध्ये तणाव निर्माण करणे चुकीचे आहे.
तर अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप म्हणाले की, आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना विनाकारण रस्त्यावर आंदोलन करणे किंवा सामान्य नागरिकांना त्रास देणे योग्य नाही. पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्नही झाला आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. संशयित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
हे देखील वाचा –
जम्मू-काश्मीरचे मिथुन मन्हास बीसीसीआयचे नवे अध्यक्ष
राज्यात पावसाने विश्रांती घेतली;अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती कायम