Ravindra Chavan Vilasrao Deshmukh Statement : लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर येथील एका मेळाव्यात दिवंगत लोकनेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, असे विधान चव्हाण यांनी केले होते. या विधानानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपचा निषेध केला आहे.
नेमकी घटना काय?
लातूर महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. भाषणाची सुरुवात करताना कार्यकर्त्यांचा जोश पाहून रवींद्र चव्हाण म्हणाले की, “तुमचा हा उत्साह सांगतोय की, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही.” या विधानामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले. मेळावा संपल्यानंतर चव्हाण यांनी माध्यमांशी बोलणे टाळले, ज्यामुळे चर्चेला अधिक उधाण आले.
काँग्रेसचा घणाघाती पलटवार
रवींद्र चव्हाण यांच्या विधानावर काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अधिकृत निवेदनातून जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका करताना म्हटले की, “विलासरावांच्या निधनाला 13 वर्षे उलटल्यानंतरही त्यांच्या आठवणी नष्ट व्हाव्यात ही कामना भाजपच्या द्वेषाचे राजकारण दर्शवते. त्यांचे स्थान केवळ लातूरमध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, जे कधीही पुसले जाऊ शकत नाही.”
काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, विलासराव देशमुखांनी लातूरला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली आहे. त्यांचे लातूरशी असलेले नाते भाजपच्या नेत्यांना कधीच समजणार नाही. सत्तेचा माज असलेले हे नेते बरळत असून, लातूरकर अशा अपमानाचा करारा जवाब देतील, असा इशाराही त्यांनी दिला.
निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष तीव्र
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विलासराव देशमुखांच्या वारशाचा विषय निघाल्याने हा वाद अधिक गडद होण्याची शक्यता आहे. लातूर म्हणजे विलासराव देशमुख असे समीकरण अनेक दशकांपासून आहे. आता भाजप या आठवणी पुसण्याचा दावा करत असल्याने आगामी काळात लातूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट आणि टोकाचा संघर्ष पाहायला मिळू शकतो.









