Ravindra Chavan : विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात राज्यातील विविध भागांत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. लातूर आणि जालना जिल्ह्यांत आज त्यांच्या विधानाचा निषेध करत आंदोलने करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत विलासराव देशमुख यांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
दरम्यान, जालना येथेही या विधानाचे तीव्र पडसाद उमटले. मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये जाऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. जर त्यांनी तात्काळ माफी मागितली नाही, तर राज्यभर ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील अत्यंत आदरणीय नेतृत्व असून, त्यांच्याविषयी केलेले विधान हे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावणारे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वाढता जनक्षोभ लक्षात घेता रवींद्र चव्हाण यांनी अखेर या प्रकरणी माफी मागितली आहे. आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल खेद व्यक्त करत आपण कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विलासराव देशमुख यांच्याविषयी असलेला जनसन्मान पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.
हे देखील वाचा – Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस; ‘हे’ आहे कारण









