Home / महाराष्ट्र / Ravindra Dhangekar : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब; पण बैठकीत रवींद्र धंगेकरांना ‘नो एन्ट्री’

Ravindra Dhangekar : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब; पण बैठकीत रवींद्र धंगेकरांना ‘नो एन्ट्री’

Ravindra Dhangekar : राज्यात 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पुण्यामध्ये राजकीय समीकरणे वेगाने...

By: Team Navakal
Ravindra Dhangekar
Social + WhatsApp CTA

Ravindra Dhangekar : राज्यात 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पुण्यामध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती न करण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

मात्र, या युतीच्या पहिल्याच संयुक्त बैठकीत शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण नसल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत दोन्ही पक्षांतील जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली. या बैठकीला भाजपच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माधुरी मिसाळ आणि धीरज घाटे उपस्थित होते. तर शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे आणि नाना भानगिरे यांनी सहभाग घेतला. मात्र, शिवसेनेचे प्रमुख स्थानिक चेहरा असूनही धंगेकर या चर्चेतून गायब होते.

धंगेकरांना पंगा नडला?

रवींद्र धंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांवर, विशेषतः मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रखर टीका केली होती. कोथरुडमधील गुन्हेगारी आणि जैन बोर्डिंग प्रकरणावरून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजप नेत्यांनी धंगेकर यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. विजय शिवतारे यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, काही गोष्टी समंजसपणे टाळाव्या लागतात.

जागावाटपाचे काय आहे समीकरण?

या बैठकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून शिवसेनेला २५ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, रवींद्र धंगेकर यांनी यापूर्वी ३० पेक्षा कमी जागा स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. धंगेकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि भाजप नेत्यांशी असलेल्या वादामुळे महायुतीच्या गणितात अडथळा येऊ नये, म्हणून स्वतः शिवसेनेनेच त्यांना चर्चेतून बाजूला ठेवले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धंगेकर यांची प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणावर रवींद्र धंगेकर यांनी सावध भूमिका घेतली आहे. “बैठकीबाबत मला अधिकृत माहिती मिळालेली नाही. मी सध्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यामध्ये व्यस्त आहे. भाजपची माझ्यावरची नाराजी वाढते की कमी होते, हे मला पाहावे लागेल,” असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे धंगेकर ज्या ठिकाणी मुलाखती घेत होते, तिथूनच इतर शिवसेना नेते भाजपसोबतच्या बैठकीला रवाना झाले, मात्र धंगेकर तिथेच थांबले होते.

पुणे महापालिकेच्या या रणसंग्रामात आता भाजप-शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी असा त्रिकोणी सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा – उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक; मतदानानंतर पक्षात फक्त पिता-पुत्रच उरतील; रावसाहेब दानवेंचा घणाघात

Web Title:
संबंधित बातम्या