Ravindra Jadeja : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामात काल ३० मार्च रोजी एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला सामना क्रिकेटप्रेमींसाठी केवळ एक खेळ न राहता भावनांचा सोहळा ठरला. या अटीतटीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजवत चेन्नईचा एकतर्फी पराभव केला. मात्र, या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अनेक वर्षांनंतर चेन्नईच्या विरोधात मैदानात उतरलेला अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र राजस्थानच्या अचूक माऱ्यासमोर चेन्नईचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. चेन्नईने आपल्या सर्व १० विकेट्स गमावून केवळ १२७ धावा धावफलकावर लावल्या. राजस्थानने हे माफक लक्ष्य केवळ १२.१ षटकांतच साध्य केले. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने अवघ्या १७ चेंडूत ५२ धावांची धडाकेबाज खेळी करत विजयाचा पाया रचला, तर अनुभवी यशस्वी जैस्वाल याने ३६ चेंडूत ३८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
सामन्यातील सर्वात हृदयस्पर्शी क्षण तेव्हा आला, जेव्हा रविंद्र जडेजा राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत गोलंदाजीसाठी सज्ज झाला. अनेक वर्षे चेन्नईचा अविभाज्य भाग राहिलेला जडेजा जेव्हा प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात आला, तेव्हा संपूर्ण स्टेडियमने “जड्डू-जड्डू” अशा घोषणा देत त्याचे स्वागत केले. चाहत्यांचे हे अलोट प्रेम पाहून जडेजा क्षणभर थबकला, तो कमालीचा भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मात्र, ही भावूकता त्याने खेळावर हावी होऊ दिली नाही. आपल्या तीन षटकांच्या कोट्यात त्याने चेन्नईच्या डावाला खिंडार पाडले. आठव्या षटकात जडेजाने सरफराज खान आणि शिवम दुबे या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करून चेन्नईची कंबरडली.
दुसरीकडे, राजस्थानचा कणा असलेला संजू सॅमसन यंदा चेन्नईच्या ताफ्यातून खेळताना दिसला, तर जडेजा राजस्थानकडून खेळत होता. हा अदलाबदलीचा अनुभव चाहत्यांसाठीही थक्क करणारा होता. सामना संपल्यानंतर मैदानावर आणखी एक विलक्षण दृश्य पाहायला मिळाले. आपल्या जुन्या संघाप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम व्यक्त करताना रविंद्र जडेजाने चेन्नईच्या जर्सीवरील ‘सीएसके’च्या लोगोचे चुंबन घेतले, ज्याने उपस्थित चाहत्यांची मने जिंकली.










