Rickshaw License Scam: मीरा-भाईंदर परिसरात रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांमध्ये झालेल्या मोठ्या गैरप्रकारानंतर राज्य सरकार आता ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे परप्रांतीयांनी परवाने लाटल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, आता सर्व परवान्यांची सखोल फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, या तपासणी दरम्यान रिक्षाचालकाची मराठी भाषेवरील पकडही तपासली जाणार असून, मराठी न येणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
बोगसगिरीला चाप बसणार
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या संदर्भात तक्रार केली होती. स्थानिक प्रशासनातील काही व्यक्तींच्या मदतीने अनेक परप्रांतीयांनी खोटी कागदपत्रे आणि बनावट रहिवासी दाखले सादर करून रिक्षा-टॅक्सीचे परवाने मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा प्रकार शहराच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो, हे ओळखून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागील 10 वर्षांतील सर्व परवान्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठी येणे आता अनिवार्य
मोटार वाहन विभागाच्या नियमांनुसार, रिक्षा चालवण्याचा परवाना हवा असेल तर संबंधित व्यक्तीला प्रादेशिक भाषा म्हणजेच मराठी येणे आवश्यक आहे. फेरतपासणीसाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेत चालकांना मराठी बोलता येते का, याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. ज्या चालकांना मराठीचे ज्ञान नसेल, त्यांचे परवाने रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
दोषी अधिकाऱ्यांची गय नाही
या घोटाळ्यात केवळ रिक्षाचालकच नाही, तर ऑनलाइन प्रक्रिया असतानाही बोगस कागदपत्रांना मंजुरी देणारे आरटीओ अधिकारीही रडारवर आहेत. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल 1 मेपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई करण्याचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत.
सुरक्षेसाठी विशेष मोहीम
मीरा-भाईंदरमध्ये महिनाभराचा विशेष कॅम्प लावून प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्रांची बारकाईने छाननी केली जाईल. बोगस परवान्यांमुळे गुन्हेगारी वाढण्याची भीती असल्याने ही मोहीम अत्यंत कडकपणे राबवण्यात येणार आहे.
हे देखील वाचा –










