Home / महाराष्ट्र / Ritu Tawde BMC Mayor : मुंबईकरांना पाणीपट्टी दरवाढीपासून दिलासा; नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांचे ‘व्हिजन मुंबई’ समोर

Ritu Tawde BMC Mayor : मुंबईकरांना पाणीपट्टी दरवाढीपासून दिलासा; नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांचे ‘व्हिजन मुंबई’ समोर

Ritu Tawde BMC Mayor : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात...

By: Team Navakal
Ritu Tawde BMC Mayor
Social + WhatsApp CTA

Ritu Tawde BMC Mayor : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या प्रथम भाषणात महापौर रितू तावडे यांनी मुंबईकरांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. विशेषतः दरवर्षी होणाऱ्या ८ टक्के पाणीपट्टी दरवाढीला स्थगिती देऊन मुंबईकरांना मोठा दिलासा देण्याचे त्यांनी जाहीर केले. महायुतीच्या ‘विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई’ या संकल्पनेशी कटिबद्ध राहून शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

बुधवारी महानगरपालिका सभागृहात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी काम पाहिले. विरोधी पक्षांकडून कोणताही अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

‘टँकर माफियामुक्त मुंबई’चे धोरण-
शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी महापौरांनी ‘टँकर माफिया फ्री मुंबई’ हे विशेष धोरण राबविण्याचे जाहीर केले आहे. टँकर लॉबीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आगामी पाच वर्षांत सर्व प्रलंबित पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. प्रत्येक प्रशासकीय विभागात पाणी गळती शोधण्यासाठी आधुनिक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. तसेच, पाण्याचे समान वाटप व्हावे यासाठी ‘फ्लो मीटर’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्य जलसंचयन) करणाऱ्या नागरिकांना पाणीपट्टी आणि मालमत्ता करात सवलत देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे.

पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण-
मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौरांनी ‘युटिलिटी टनेल’ची संकल्पना मांडली आहे. ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते डांबरी आणि ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते पूर्णतः सिमेंट काँक्रीटचे केले जातील. पादचाऱ्यांसाठी विशिष्ट प्रकारच्या काँक्रीटपासून बनवलेले ‘फ्रेंडली फूटपाथ’ विकसित केले जाणार असून, वाढत्या वाहनसंख्येचा विचार करता भुयारी आणि बहुमजली वाहनतळ (पार्किंग) उभारण्यावर भर दिला जाईल.

आरोग्य आणि सामाजिक कल्याण-
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर ‘महापौर निधी’मध्ये मोठी वाढ करण्याचा मानस रितू तावडे यांनी व्यक्त केला आहे. सध्याची ५ हजार रुपयांची मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच, महापालिका शाळांमध्ये संविधानातील मूल्यांचे शिक्षण देण्यावर भर दिला जाईल.

फेरीवाल्यांचे पुनर्वसन आणि नियोजन-
शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व पात्र फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना त्वरित ‘विक्रेता प्रमाणपत्र’ आणि ओळखपत्र दिले जाईल. मुंबईत अधिकृत ‘हॉकिंग झोन’ निश्चित करून फेरीवाल्यांचे तिथे पुनर्वसन केले जाईल आणि उर्वरित सर्व भाग ‘नो-हॉकिंग झोन’ म्हणून घोषित करण्यात येतील.

प्रशासक ते आयुक्त: भूषण गगराणी यांची भूमिका-
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासक म्हणून अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. आता त्यांची प्रशासक म्हणून कारकीर्द संपली असून, निवृत्तीपूर्वीचे उर्वरित ४० दिवस ते पूर्णवेळ आयुक्त म्हणून काम पाहतील. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या