Home / महाराष्ट्र / Ritu Tawde : काँग्रेसमधून आलेल्या रितू तावडे मुंबईच्या महापौर !उपमहापौरपदाचा अजब निर्णय! दर सव्वा वर्षांनी महापौर बदल

Ritu Tawde : काँग्रेसमधून आलेल्या रितू तावडे मुंबईच्या महापौर !उपमहापौरपदाचा अजब निर्णय! दर सव्वा वर्षांनी महापौर बदल

Ritu Tawde : देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेत 2012 साली काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रितू तावडे या महापौर झाल्या....

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 Ritu Tawde : देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेत 2012 साली काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रितू तावडे या महापौर झाल्या. उपमहापौर पदासाठी शिंदे सेनेने अजब निर्णय घेतला. मुंबईचा उपमहापौर दर सव्वा वर्षांनी बदलणार आहे. पहिल्या सव्वा वर्षांसाठी संजय घाडी यांचे नाव घोषित करण्यात आले. संजय घाडी यांनी मनसे, शिवसेना, उबाठा, शिंदे सेना असा प्रवास केला आहे. विशेष म्हणजे उबाठाने माघार घेत दोन्ही पदांवर उमेदवार दिला नाही.आता औपचारिकता म्हणून 11 फेब्रुवारी रोजी मुंबई महापौर, उपमहापौर निवड जाहीर करण्यात येणार आहे. विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक 16 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर शिक्षण समिती, स्थायी समितीचा अध्यक्ष निवडला जाईल. आज नावांची घोषणा झाल्यानंतर मातोश्रीवर संजय राऊत, किशोरी पेडणेकर यांची बैठक झाली आणि मग किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केले की मराठी महापौर दिल्यामुळे आम्ही त्यांना अपशकून करणार नाही. मुंबई महानगरपालिकेची सत्ता पहिल्यांदाच हस्तगत करण्यात यश मिळवलेल्या भाजपाने आज महापौरपदाचा आपला उमेदवार जाहीर केला.


महापौर व उपमहापौर उमेदवारीच्या घोषणेसाठी महायुतीच्या नेत्यांची आज सकाळी बैठक पार पडली. यावेळी भाजपाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. मनोज कोटक, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम तर शिंदे सेनेकडून सरचिटणीस राहुल शेवाळे, गटनेते अमेय घोले, शीतल म्हात्रे आदि उपस्थित होते.सुरुवातीला राहुल शेवाळे यांनी उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांचे नाव जाहीर केले व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश वाचून दाखवला. त्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी संजय घाडी यांचे अभिनंदन केले आणि त्यानंतर महापौर पदासाठी रितू तावडे यांच्या उमेदवारीची घोषणाही  केली.


53 वर्षीय रितू तावडे या मुंबई महानगर पालिका प्रभाग क्रमांक 132, घाटकोपरमधून दुसर्‍यांदा निवडून आल्या आहेत.  त्या ज्या मतदार संघातून निवडून आल्या आहेत तो गुजरातीबहुल मतदारसंघ आहे. मराठा समाजातून निवडून येणार्‍या रितू तावडे या भाजपाच्या  युवा महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. रितू तावडेंची ही नगरसेवकपदाची दुसरी टर्म असून महापौरपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर होते. नगरसेवकपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्या शिक्षण समिती अध्यक्ष, मुंबई उपनगरे स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष होत्या. याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक, भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योग प्रोफेशनल ट्रेनिंग असोसिएटच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. त्याशिवाय भारतीय जनता पक्षात त्यांनी  मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समिती संयोजक, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष, ईशान्य मुंबई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अशा पदांवर काम केलेले आहे. सामाजिक संस्थांसोबतही त्या जोडलेल्या आहेत.


रितू तावडे यांनी आभार मानत म्हटले की, मुंबईच्या  महापौरपदासाठी  निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच  होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेवक निवडून गेले आहेत. सभागृहाची मान मर्यादा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावे अशी माझी अपेक्षा आहे.
उपमहापौर पदासाठी शिंदे सेनेच्या संजय घाडी यांची निवड झाली असून त्यांनी यापूर्वी विविध पदांवर काम केले आहे.  1988-89 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख, 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंड कौन्सिलचे अध्यक्ष व सिनेट सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस, शिवसेना उपनेते व सध्या शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. 2017  ते 2022  शिवसेना नगरसेवक होते. त्यांनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला. त्यांच्या पत्नी संजना घाडी शिंदे सेना  उपनेत्या व प्रवक्त्या आहेत. त्यांचा पुत्र सुयश युवासेना विधानसभा समन्वयक आहे. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी उबाठा सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला.
संजय घाडी यांनी महायुतीचे नगरसेवक आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी  यांनी म्हटले की,  माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करीन.


दुसरीकडे मातोश्री येथील बैठकीनंतर उबाठाच्या विद्यमान गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, भाजपाकडून मराठी महापौर दिल्यामुळे आम्ही त्यांना अपशकून करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणिते मान्य आहेत.
दरम्यान महापालिका विरोधी पक्षनेत्याची निवड 16 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून 20 फेब्रुवारी रोजी स्थायी समिती अध्यक्ष, सुधार आणि बेस्ट समितीची निवड 23 फेब्रुवारी रोजी होईल. उर्वरित समित्यांचे अध्यक्ष 25 फेब्रुवारीला निवडण्यात येणार आहेत तर पालिकेचा अर्थसंकल्प यंदा मार्चमध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेत नाराजी नाट्य मुंबई महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार निश्चित झाल्यावर नाराजीनाट्य सुरू झाले. शिंदे सेनेच्या मुंबईतील काही पदाधिकार्‍यांनी आपली नाराजी व्यक्त करत संजय घाडी यांची निवड करताना आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही असे म्हटले. आता त्यांची नाराजी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष घालून दूर करणार आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या