Rohit Arya : पवईमधील स्टुडिओमध्ये लहान मुलांना ओलिस ठेवल्याच्या प्रकरणातील अपहरणकर्ता रोहित आर्य याला गोळी लागली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं जिथे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यावर शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यात अंत्यसंस्कारा दरम्यान त्याच्यावर कोणताही धार्मिक विधी न करता मध्यरात्री २ वाजून २४ मिनिटांनी विद्युत दाहिनीमध्ये त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.
रोहित आर्याच्या अंत्यसंस्कारावेळी त्याची पत्नी, मुलगा, एक नातेवाईक आणि मुलाचे दोन मित्र एवढेच जण यावेळी उपस्थित होते. मुंबईतील जेजे रुग्णालयातून त्याचा मृतदेह पुण्यात आणण्यात आला गेला. रोहित आर्यच्या कृत्यामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक चर्चेमुळे पत्नी अंजली आर्य यांच्यावरील सामाजिक दबाव अधिक वाढला होता. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी कोणीच पुढे आले नाही. फक्त चार ते पाच जणांच्या उपस्थितीत घाईघाईत विधीशिवाय रोहित आर्य वर अंत्यसंस्कार पार पडल्याची माहिती आहे.
रोहित आर्य याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट आठचे प्रभारी पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर पोलिसांच्या गोळीबारात झालेल्या रोहितच्या मृत्यूचा तपास युनिट दोनचे प्रभारी पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर आणि विशाल राजे यांचे पथक करत आहे. या अपमृत्यूची न्यायालयीन चौकशी देखील होणार असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी रोहितसोबत एक-दीड तास संवाद साधला होता. मात्र, या संभाषणादरम्यान त्याची प्रचंड चलबिचल सुरू होती, असल्याची पोलिसांची माहिती आहे. एक-दोन मिनिटे बोलल्यानंतर तो सतत आतमध्ये जाऊन सर्व जागच्या जागी आहेत का? हे पाहायचा. यामध्ये आठ ते दहा मिनिटे अधिक जायची. यामुळे सलग संवाद साधताना वारंवार अडचणी येत होत्या.
पोलिसांना घटनास्थळावरून एअरगन, ज्वलनशील रसायन अश्या बऱ्याच वस्तू सापडल्या. एअरगन आणि इतर वस्तू त्याने कुठून खरेदी केल्या? याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. रोहितने त्याच्याकडील एअरगनमधून गोळी झाडली की नाही, याबाबतही अद्याप काही स्पष्टता नाही आहे. तसेच रोहितने आणलेले ज्वलनशील रसायन नेमके काय होते, ते त्याला कुठून मिळाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहितच्या मृत्यूवरही बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, पारदर्शक तपास व्हावा, यासाठी हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हे देखील वाचा –









