Home / महाराष्ट्र / Rohit pawar : एकनाथ शिंदे दावोसला जात असताना इराण हद्दीत त्यांचे विमान पाडणार होते! नवा गौप्यस्फोट

Rohit pawar : एकनाथ शिंदे दावोसला जात असताना इराण हद्दीत त्यांचे विमान पाडणार होते! नवा गौप्यस्फोट

Rohit pawar – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार...

By: Team Navakal
Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash
Social + WhatsApp CTA

Rohit pawar – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सतत या अपघाताबाबत धक्कादायक माहिती जाहीर करत नवनवे आरोप करत आहेत. त्यांनी आजही मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विमान अपघातापूर्वी बारामतीत अपघाताच्या ठिकाणी रेकी करण्यासाठी काही लोक आले होते, असे स्थानिकांनी सांगितल्याचा दावा केला.  इतकेच नव्हे तर त्यांनी दावा केला की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना दावोसला याच व्हीएसआर विमानाने जात होते तेव्हा इराणच्या हवाई हद्दीत त्यांचे विमान पाडणार होते. रोहित पवार यांच्या या दाव्याने खळबळ माजली आहे. अपघाताच्या तपास अहवालातील अनेक त्रुटींवरही गंभीर प्रश्न उपस्थित करत व्हीएसआर कंपनीला कुणीतरी वाचवते आहे, असा आरोप त्यांनी केला. रोहित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तीन वर्षांपूर्वी दावोसला जात असताना याच व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव धोक्यात सापडला होता.


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जानेवारी 2023 मध्ये ते स्वित्झर्लंडला दावोस दौऱ्यावर निघाले होते. त्यावेळी त्यांनी याच ‌‘व्हीएसआर‌’ कंपनीचे व्हीटी-सीएमआर विमान भाड्याने घेतले होते. मुंबईहून उड्डाण केल्यानंतर विमान बहारिनमध्ये इंधन भरण्यासाठी थांबले. त्यानंतर विमान दावोसला जाताना इराणच्या हवाई क्षेत्रात शिरले. विमानाने इराण हवाई क्षेत्रात प्रवेश करताच या विमानाला परत फिरण्याचा इशारा देण्यात आला. विमान परत घ्या नाहीतर हे विमान पाडण्यात येईल, असे इराण प्रशासनाने सांगितले. याचे कारण इराणच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी या कंपनीने घेतलीच नव्हती. हे विमान पाडण्याचा इशारा मिळाल्यानंतर विमान घाईने वळविण्यात आले आणि ते इराकच्या हवाई हद्दीत गेले. इथेही हाच प्रकार घडला. इराकने हे विमान ताबडतोब त्यांच्या हवाई हद्दीतून बाहेर नेण्यास सांगितले. विमान बाहेर नेले नाही तर आम्ही ते पाडू, असा इशारा पुन्हा देण्यात आला.

याचेही कारण तेच होते. कंपनीने इराकच्या हद्दीत प्रवेश करण्याची अधिकृत परवानगी घेतलेली नव्हती. अखेरीस विमान परत बहारिनला आणले. बहारिनमध्ये सुमारे 3 तास ताटकळल्यानंतर आणि पुन्हा आवश्यक परवानगी मिळवल्यानंतर हे विमान झ्युरिचकडे रवाना झाले. हा केवळ तांत्रिक बिघाड नसून व्हीएसआर विमान कंपनीने राज्याच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेशी केलेली मोठी तडजोड होती. याच ‌‘व्हीएसआर‌’ कंपनीवर कोविड काळात रुग्णांची अवास्तव आर्थिक लूट, आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. अरब अमिरातीत या कंपनीवर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. ज्या कंपनीच्या विमानामुळे एकनाथ शिंदे दोन देशांच्या लढाऊ विमानांच्या निशाण्यावर आले होते, ज्या कंपनीमुळे राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या प्रवासाच्या सुरक्षित इतका मोठा निष्काळजीपणा झाला, त्याच कंपनीच्या कार्यपद्धतीकडे तपास यंत्रणा आणि डीजीसीए दुर्लक्ष का करत आहेत? शिंदे यांच्या पक्षाने व्हीएसआर विमानाने प्रवास करणार नसल्याचे घोषित केले. मात्र नुकतेच मंत्री दादा भुसे यांनी त्या विमानाने प्रवास केला. त्यामुळे नेत्यांनी यासंदर्भात सतर्क राहायला हवे, असे रोहित पवार म्हणाले.


रोहित पवार यांनी आरोप केला की, विमान अपघाता-संदर्भातील एएआयबीचा अहवाल द्यायचा म्हणून दिला आहे.  अपघाताचा अहवाल तयार करण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागला. त्यामुळे अहवालात चुका होणे अपेक्षित नव्हते. या अहवालात झाडाला विमान धडकून अपघात झाल्याचे म्हटले आहे. पण तिथे फक्त झुडपे आहेत. झुडुपांची उंची आणि विमानाची उंची जुळत नाही. केवळ रिपोर्ट द्यायचा म्हणून दिला आहे. अपघाताची जबाबदारी झाडांवर ढकलण्यासाठीच एएआयबीकडून असा दिशाभूल करणारा अहवाल तयार केला. त्यामुळे अहवाल गांभीर्याने बनवण्यात आला का, हा प्रश्न निर्माण होतो. मी व्हीएसआर किंवा डीजीसीएच्या विरोधात नाही. पण या कंपनीला कुणीतरी वाचवत आहे. हा प्रयत्न कोणा मोठ्या व्यक्तीकडून होतो आहे का? असे असेल तर अजितदादांचा घात की अपघात याचा तपास योग्य रितीने होणार नाही. त्यांचे विमान उजव्या बाजूला झुकल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. मात्र अहवालात विमान डाव्या बाजूला झुकले असे म्हटले आहे. जे पूर्णपणे चूक आहे. या अहवालात ब्लॅक बॉक्सचा फोटो अपेक्षित होता. मात्र त्यांनी तो दिलेला नाही.

ब्लॅक बॉक्सचे कुठेही नुकसान झालेले नाही. हे लेअरजेट 45 एक्सआर विमान आधी सुरतला गेले होते. अजित दादांना सोडून हे विमान हैदराबादला जाणार होते. या विमानात 90 टक्के इंधन भरले होते. यामुळे अपघात झाल्यावर मोठा स्फोट झाला. या विमानाच्या उड्डाणाचे फक्त 85 तासांचे आयुष्य उरले होते, असे सांगितले जात होते.  प्रत्यक्षात या विमानाच्या उड्डाणाचे 3 हजार तास जास्त झाले होते. मुख्य पायलट काहीच बोलत नव्हता. दृश्यमानता कमी होती हेदेखील अहवालातून स्पष्ट झाले आहे. सरकारसाठी विमानांचे नियोजन करणारी ॲरो कंपनी, कर्मचारी मनोज पवार, मालक या सगळ्यांची चौकशी केल्याशिवाय खरे कळणार नाही. डीजीसीएमधील अधिकाऱ्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताकदवान लोकांच्या मदतीने हा प्रयत्न होत असेल तर तपास योग्य पद्धतीने होणार नाही. या सर्वांकडे क्रिमिनल आणि तांत्रिक दृष्टीने बघावे लागणार आहे. कागदपत्रे रंगवली जाऊ शकतात. तसेच होत आहे. अपघात आणि पत्रकार परिषदेनंतर ही विमाने महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर काढली जात आहेत. हैदराबादला असलेले लेगसी 600 हे विमान आता सॅन मारिनो (अमेरिका)ला हलवण्यात आले आहे. धंदासुद्धा भारतातून हलवण्याचे  काम सुरू झाले आहे. जर तुम्ही चोर नसाल घाबरता कशाला? चोरच घाबरू शकतो.


रोहित पवारांनी असाही दावा केला की, अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी रेकी करण्यासाठी तिथे काही लोक आले होते, असे स्थानिकांनी सांगितले आहे. याबाबत तपास झाला पाहिजे. याकडे सीआयडी व सीबीआयने थोडेसे लक्ष घालावे. व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा 2023 मध्ये मुंबई विमानतळावर अपघात झाला होता, त्यावेळी के. रामचंद्रन यांचे नाव तपास अधिकारी म्हणून लिहिले होते. ते विमान मालकाने नंतर दिल्लीला नेले. पण अजित पवारांच्या अपघाताच्या अहवालात कोणत्याही तपास अधिकाऱ्याचे नावच नाही. कारण ते घाबरले असतील. कागदपत्रांची हेराफेरी वगैरे गोष्टी होणार आहेत. त्यामुळे नावच नको. म्हणजे त्यांच्यावर कोणी आक्षेपच घेणार नाही.
रोहित पवारांनी घेतली
उद्धव ठाकरेंची भेट

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज संध्याकाळी मातोश्री निवासस्थानावर जाऊन माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी अजित पवार विमान अपघात प्रकरणी 45 मिनिटे चर्चा केली. या भेटीनंतर रोहित पवार यांनी सांगितले की,अजितदादांना न्याय मिळवून देण्याच्या आमच्या लढ्यात उद्धव ठाकरे आमच्या सोबत आहेत. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. विमान अपघात प्रकरणी योग्य तपास  करण्यात येत नाही.अद्याप याप्रकरणी एफआयआर दाखल झालेली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.आमचा नेता आणि माझा काका गेला. मात्र लोक अनेक विमानातून प्रवास करतात. लोकांचाही सुरक्षेचा विषय आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
आमचे वरपर्यंत संबंध
व्ही.के.सिंगची धमकी

रोहित पवार यांनी व्हीएसआरचा मालक व्ही.के.सिंग याच्यावर गंभीर आरोप केला.  ते म्हणाले की, आमच्या माणसाला व्हीएसआरचा मालक व्ही.के.सिंगचा व्हॉट्सॲपवर कॉल आला होता. त्याने सांगितले की, एएआयबीने मला क्लिअरन्स दिला आहे. अधिकची माहिती तुम्हाला कशाला पाहिजे? खालपासून वरपर्यंत आमची ओळख आहे. कोणीच आमचे काही बिघडवू शकत नाही. आताही आमची विमाने उडत आहेत. सरकारही आमचे विमाने वापरत आहे, तर तुम्हाला काय अडचण आहे?  व्हॉट्सॲप हॅकिंगची यंत्रणा असेल तर हे शोधून काढा. अपघाताच्या आधी सहा महिने सिंग कुणाशी बोलत होता, दिल्लीत महाराष्ट्र सदनमध्ये सिंग कुणाला भेटला होता, हेही शोधून काढा. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला तरी एवढी हिंमत येते कुठून?

व्हीएसआरमागे शक्तिशाली लोक
रोहित पवार म्हणाले की, डीजीसीएचे जॉइंट डायरेक्टर मनीष कुमार यांचे घर व्ही.के. सिंग यांनी बांधून दिल्याची माहिती आहे. आंध्रप्रदेशच्या तेलगू देसम पक्षाचे उद्योग मंत्री सिंग यांच्याशी  थेट संबंध आहे. व्हीएसआरमध्ये  90 लाख शेअर विस्ता कंपनीचे आहेत. विस्ता सेलमध्ये अम्बूजा आणि लंबोदरची गुंतवणूक आहे. विस्ता सेलच्या 27 वेगवेगळ्या कंपन्या आहेत. महेंद्र कुमार गोयंका या कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत. या कंपनीत संजय पाठक नावाची व्यक्ती आहे. ते भाजपाचे मध्यप्रदेशचे आमदार आहेत. ते अतिशय श्रीमंत आहेत. या कंपन्यांमध्ये संजय पाठकचा मुलगा संचालक आहे. एका आमदाराने 242 कोटींचे प्रायव्हेट विमान विकत घेतले आहे. नाशिकचे दिलीप बिल्डकॉनचे दिलीप सूर्यवंशी यांनी या कंपनीला गॅरंटी दिली आहे. ती कुणाच्या सांगण्यावरून दिली? यांना कोण वाचवत आहे? ज्युबली हिल्समध्ये कोण राहते?  बाजारभावापेक्षा 17 कोटी रुपये जास्त देऊन ही मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. नमन आणि सोफिटेल समूह व्हीएसआरच्या पाठीशी आहेत. व्हीएसआरमध्ये 100 कोटींची  गुंतवणूक झाली. यामागे कोण आहे, हे शोधून काढले पाहिजे. डीजीसीए या लोकांना वाचवत आहे. दादांची चौकशी राहिली बाजूला, संजय पाठकने जजलाही मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे डीजीसीएला मॅनेज करायला किती वेळ लागेल? तुमचा पैसा कायदेशीर आहे की हवालामार्फत आणला आहे याच्याशी आम्हाला घेणे नाही. फक्त चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे एवढेच म्हणायचे आहे.

—————————————————————————————————————————–

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या