Rohit Pawar : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात अत्यंत जड अंतःकरणाने झाली. विमान अपघातात निधन झालेले राज्याचे नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणातून अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. काकांच्या आठवणी सांगताना रोहित पवार यांना आपले अश्रू अनावर झाले होते.
बटण उघडं ठेवून देणार श्रद्धांजली
रोहित पवार यांनी अजितदादांच्या शिस्तीचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “दादा मला नेहमी टोकायचे की, रोहित तुझ्या शर्टचं वरचं बटण उघडं असतं, ते लावत जा. पण आज मी ठरवलंय की, जोपर्यंत चाळीस-पन्नास वर्षांनंतर माझी आणि दादांची वर भेट होत नाही, तोपर्यंत मी हे बटण असंच उघडं ठेवणार. हे उघडं बटण मला रोज दादांची आठवण करून देत राहील. जेव्हा मी त्यांना पुन्हा भेटेन, तेव्हाच त्यांच्यासमोर हे बटण लावेन.”
शारीरिक वजन कमी करणार, राजकीय वाढवणार
अजित पवारांच्या मिश्कील स्वभावाचा उल्लेख करताना रोहित पवार म्हणाले की, दादा नेहमी माझ्या वाढलेल्या केसांवरून आणि वजनावरून मला चिडवायचे. “रोहित, तुझ्या झिपऱ्या वाढल्यात त्या कमी कर आणि तुझं शारीरिक वजन कमी करून राजकीय वजन वाढव,” असा सल्ला ते नेहमी द्यायचे. “मी दादांना शब्द देतो की, मी माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन, पण शारीरिक वजन कमी करून राजकीय वजन नक्कीच वाढवेन,” असे सांगताना रोहित पवारांचा आवाज गहिवरला होता.
दोषींना तुरुंगात धाडणारच!
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. “काकांचा अपघात नेमका कसा झाला, यामागे जो कोणी दोषी असेल, तो कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही. त्याला तुरुंगाची हवा खावीच लागेल आणि शिक्षा मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, काकींच्या (सुनीता पवार) राजकीय प्रवासात आपला पुतण्या म्हणून पाठिंबा सदैव राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
राज्याच्या राजकारणातील एक ‘जादूगार’ आणि मिश्कील व्यक्तिमत्व हरपल्याची भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भाषणामुळे संपूर्ण सभागृह सुन्न झाले होते.













