Home / महाराष्ट्र / Rohit Pawar : अजित पवार विमान अपघात: रोहित पवारांकडून तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह; DGCA च्या निष्कर्षांवर रोहित पवारांचे शंका-बाण; व्हिडिओ पुराव्याने केला दावा

Rohit Pawar : अजित पवार विमान अपघात: रोहित पवारांकडून तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह; DGCA च्या निष्कर्षांवर रोहित पवारांचे शंका-बाण; व्हिडिओ पुराव्याने केला दावा

Rohit Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर या प्रकरणातील गूढ अधिकच वाढत चालले आहे....

By: Team Navakal
Rohit Pawar
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर या प्रकरणातील गूढ अधिकच वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. मात्र, या अहवालावर आमदार रोहित पवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी तपासाच्या विश्वासार्हतेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

विमान कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न?
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, त्यांचा विरोध ‘व्हीएसआर’ (VSR), ‘एरो’ सारख्या खासगी कंपन्या किंवा थेट ‘DGCA’ या संस्थेला नाही. मात्र, या यंत्रणांच्या माध्यमातून कोणाला तरी वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असे चित्र दिसत आहे. अहवालातील तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना ते म्हणाले की, “हे विमान त्याच्या अधिकृत वयोमानापेक्षा (Official Age) तब्बल ३००० तास जास्त चालवले गेले होते. इतक्या जुन्या विमानाला उड्डाणाची परवानगी कशी मिळाली, हा मोठा प्रश्न आहे.”

अहवालातील तांत्रिक चुका आणि गांभीर्याचा अभाव-
रोहित पवार यांनी ‘एएआयबी’ (AAIB) च्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले. ते म्हणाले, “आम्ही अपेक्षेने या अहवाल्याची वाट पाहत होतो की, यात सत्य बाहेर येईल आणि कोणतीही चूक होणार नाही. परंतु, अत्यंत गंभीर चुका या अहवालात आढळल्या आहेत. इतकेच नव्हे तर तपासादरम्यान ‘बारामती’चा उल्लेख ‘जिल्हा’ म्हणून करण्यात आला आहे, यावरून तपास यंत्रणा या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहत आहेत, हे स्पष्ट होते.” हा दौरा पूर्वनियोजित नव्हता, हे आता अधिकृतपणे मान्य करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

तपासाची दिशा आणि संशयाची सुई-
अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर जो पारदर्शक तपास होणे अपेक्षित होते, तो होताना दिसत नाही, अशी नाराजी रोहित पवारांनी व्यक्त केली. “लेअर जेट विमानाची स्थिती आणि उड्डाणाचे नियम धाब्यावर बसवले गेले असतानाही कोणावर ठोस कारवाई झालेली नाही. याउलट, डीजीसीएच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या घटकांना संरक्षण दिले जात आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

पुढील संघर्षाचे संकेत-
रोहित पवार यांनी यापूर्वी मुंबईसह दिल्लीतही पत्रकार परिषदा घेऊन या अपघातातील विसंगती जगासमोर आणल्या होत्या. आजच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांच्या निधनाचे सत्य बाहेर येईपर्यंत आपण तांत्रिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर आवाज उठवत राहू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अजित पवार विमान अपघात: “अहवालात मूलभूत चुकांचा डोंगर”; रोहित पवारांनी व्हिडिओ पुराव्यासह तपास यंत्रणेचे वाभाडे काढले-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास करणाऱ्या ‘एएआयबी’ (AAIB) या संस्थेच्या अहवालातील धक्कादायक तांत्रिक विसंगती चव्हाट्यावर आणल्या आहेत. अपघाताच्या वेळचा व्हिडिओ आणि त्याचे स्क्रीनशॉट सादर करत रोहित पवारांनी हा अहवाल म्हणजे केवळ जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.

विमानाची दिशा आणि मूलभूत निरीक्षणात तफावत-
रोहित पवार यांनी अपघाताच्या व्हिडिओचा दाखला देत सांगितले की, अधिकृत अहवालात मांडलेले मुद्दे प्रत्यक्ष पुराव्यांशी विसंगत आहेत. “अहवालात विमान ‘राईट बँक’ (उजव्या बाजूला झुकलेले) झाल्याचे म्हटले आहे, परंतु व्हिडिओ पाहिल्यास हे विमान स्पष्टपणे ‘लेफ्ट’ला (डाव्या बाजूला) कोसळताना दिसत आहे. तपास यंत्रणेकडून इतकी प्राथमिक आणि मूलभूत गोष्ट कशी काय चुकू शकते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही चूक स्पष्ट करताना त्यांनी एका उदाहरणाचा वापर केला; “जर एखाद्याला गोळी डोक्यात लागली असेल आणि अहवालात ती छातीत लागली असे नमूद केले, तर त्या तपासाला काय अर्थ उरतो? इथे एएआयबी या संस्थेचे प्राथमिक निरीक्षणच (Observation) पूर्णपणे चुकलेले दिसत आहे.”

‘झाडां’चे कारण देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न?
अहवालात विमानाचा अपघात झाडांना धडकल्यामुळे झाल्याचे जे कारण देण्यात आले आहे, त्यावरही रोहित पवारांनी सडकून टीका केली. घटनास्थळाचे छायाचित्र दाखवत ते म्हणाले, “अहवालात जिथे झाडे असल्याचा दावा केला आहे, तिथे प्रत्यक्षात केवळ लहान झुडपे आहेत. विमानाची उंची आणि त्या झुडपांची उंची यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. विमानाचा त्या झुडपांना साधा स्पर्शही झालेला नाही.” तपास यंत्रणेने केवळ अहवाल पूर्ण करायचा म्हणून आणि अपघाताची जबाबदारी निसर्गावर किंवा झाडांवर ढकलण्यासाठी असा खोटा दावा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह-
रोहित पवारांच्या मते, हा अहवाल तांत्रिक निकषांवर अत्यंत कमकुवत आहे. विमानाची दिशा आणि सभोवतालची भौगोलिक परिस्थिती यांबाबत दिलेली माहिती व्हिडिओ पुराव्यांशी जुळत नसल्याने, हा तपास कोणाला तरी वाचवण्यासाठी तर केला जात नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. “एएआयबी सारखी मोठी संस्था इतक्या ढिसाळ पद्धतीने अहवाल कसा काय देऊ शकते? हा केवळ अपघाताचे गांभीर्य कमी करण्याचा प्रकार आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

अजित पवार विमान अपघात: नागरी उड्डाण मंत्रालयाचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध; शेवटच्या क्षणी कॉकपिटमध्ये काय घडले?
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सखोल तपास करणाऱ्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या ‘एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ (AAIB) ने आपला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात विमानतळावरील त्रुटींपासून ते वैमानिकांच्या शेवटच्या संवादापर्यंत अनेक महत्त्वाचे तांत्रिक खुलासे करण्यात आले आहेत.

दृश्यमानता आणि हवामानाचे आव्हान-
अहवालानुसार, ज्या वेळी हे विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते, त्या वेळी तिथे दृश्यमानता (Visibility) केवळ ३ किलोमीटर इतकी होती. वास्तविक, ‘व्हीएफआर’ (VFR – Visual Flight Rules) नियमांनुसार सुरक्षित लँडिंगसाठी किमान ५ किमी दृश्यमानता असणे आवश्यक असते. उपग्रह चित्रांनुसार, त्या परिसरात हलके धुके पसरले होते, ज्यामुळे वैमानिकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.

बारामती विमानतळावरील पायाभूत त्रुटी-
तपास यंत्रणेने बारामती येथील एअरफिल्डच्या दुरवस्थेवरही ताशेरे ओढले आहेत. अहवालात नमूद करण्यात आले आहे की-
१. बारामती हे एक ‘अनियंत्रित’ (Uncontrolled) एअरफिल्ड आहे.
२. धावपट्टीवरील (Runway) मार्किंग फिकट झाले असून तिथे सैल खडी पसरलेली होती.
३. धावपट्टीच्या बाजूला वाऱ्याची दिशा दर्शवणारा ‘विंडसॉक’ उपलब्ध नव्हता.
४. विमानतळाची संरक्षक भिंत अपुरी होती, ज्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.

अंतिम क्षण आणि अपघाताचा थरार-
विमान उतरवण्याच्या पहिल्या प्रयत्नात वैमानिकांनी ‘गो-अराउंड’ (विमान पुन्हा वर नेणे) करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना लँडिंग क्लीअरन्स मिळाला आणि वैमानिकाने “फील्ड इन साईट” (धावपट्टी दिसत आहे) असा संदेश दिला. मात्र, अगदी अंतिम क्षणी कॉकपिटमधून “Oh St…”** असा घाबरलेला आवाज ऐकू आला आणि काही क्षणांतच विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूला सुमारे ५० मीटर अंतरावर कोसळले. विशेष म्हणजे, दोन्ही वैमानिक अनुभवी होते आणि त्यांना बारामतीच्या भौगोलिक रचनेची पूर्ण कल्पना होती.

ब्लॅक बॉक्स आणि डेटा विश्लेषणाची स्थिती-
१. अपघाताच्या ठिकाणाहून विमानाचे दोन्ही महत्त्वाचे रेकॉर्डर्स—’फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ (SSFDR) आणि ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ (SSCVR)—मूळ जागी सुस्थितीत सापडले आहेत.
२. डेटा डाऊनलोड: फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीपणे डाऊनलोड करण्यात आली आहे.
३. तांत्रिक अडचण: अपघातावेळी लागलेल्या आगीमुळे या उपकरणांचे उष्णतेमुळे नुकसान झाले आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील डेटा डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री भारतात उपलब्ध नसल्याने, तो अमेरिकेतील उत्पादक कंपनीकडे तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवला जाणार आहे.

वैमानिकांची वैद्यकीय तपासणी-
अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, अपघातापूर्वी दोन्ही वैमानिकांनी मद्यपान केलेले नव्हते; त्यांची वैद्यकीय चाचणी पूर्णपणे ‘निगेटिव्ह’ आली आहे. त्यामुळे मानवी चुकांसोबतच तांत्रिक बिघाड आणि धावपट्टीच्या स्थितीवर आता तपासाचा रोख वळवण्यात आला आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या