Rohit Pawar on NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) काही नेत्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना त्यांनी गुरुवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चोख प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांच्या अंत्यविधीपूर्वीच रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू केली होती, असा दावा काही नेत्यांनी केला होता. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, “मला वैयक्तिकरित्या विलीनीकरण नको होते आणि आजही दोन्ही गट एकत्र येऊन फारसा फायदा होईल असे मला वाटत नाही. परंतु, शरद पवार साहेबांचे वय आणि कौटुंबिक ऋणानुबंध लक्षात घेता, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी ही खुद्द अजितदादांचीच भावनिक इच्छा होती.”
रोहित पवारांनी यावेळी पवार कुटुंबातील हळवे पदर उलगडले. ते म्हणाले की, “अजितदादांचे वडील अनंतरावजी पवार यांचे निधन झाले तेव्हा दादा केवळ १८ वर्षांचे होते. त्यानंतर शरद पवार साहेबांनीच त्यांना पितृवत प्रेम दिले आणि मुलाप्रमाणे सांभाळले. ही कृतज्ञतेची भावना दादांच्या मनात शेवटपर्यंत होती. रेवतीचे लग्न ठरले तेव्हा साहेबांनी दादांना फोन केला होता, त्यावेळी मी तिथेच उपस्थित होतो. साहेबांना कफ झाल्यामुळे त्यांना नीट बोलता येत नव्हते, ते पाहून दादांच्या डोळ्यात पाणी आले होते. जेव्हा ही नाती इतकी भावनिक होती, तेव्हा आम्ही त्यात राजकारण कशासाठी करू?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विलीनीकरणापेक्षा सध्या अजितदादांना न्याय मिळणे आणि त्यांच्या मृत्यू प्रकरणाचा ‘एफआयआर’ (FIR) दाखल होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त करतानाच, या लढाईत पार्थ पवार आणि जय पवार सोबत का नाहीत, असा प्रश्नही रोहित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अत्यंत संयमी भूमिका घेत त्यांनी सांगितले की, “पार्थ आणि जय हे आपापल्या परीने आणि त्यांच्या स्तरावर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलून लढा देत असतील. ते प्रयत्न करत नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल. अजितदादांच्या पत्नी (काकी) यांनीही या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल्या पद्धतीने न्यायासाठी प्रयत्नशील आहे. मुख्य अडचण ही आहे की, या अपघाताचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू आहे. कोणत्याही दबावाखाली न राहता प्रत्येकाने आपापल्या पातळीवर ही लढाई लढली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.”










