Rohit Pawar & Raj Thackeray : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत, या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सक्रिय पाठिंबा द्यावा, अशी विनंती रोहित पवार यांनी यावेळी केली. सुमारे सव्वा तास चाललेल्या या प्रदीर्घ बैठकीत अजित पवारांच्या अपघातातील संशयास्पद बाबी आणि पोलीस प्रशासनाची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, “अजित दादांचा अपघात आणि त्यातील संभाव्य घातपाताच्या संशयाबाबत मला राज साहेबांना माहिती द्यायची होती. दादांशी असलेले ऋणानुबंध लक्षात घेऊन त्यांनी मला तातडीने वेळ दिली. सव्वा तासाच्या या चर्चेत मी सर्व तांत्रिक माहिती त्यांच्यासमोर मांडली. विशेष म्हणजे, ज्या विमान कंपनीच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यावर अद्याप गुन्हा (FIR) दाखल का करण्यात आला नाही, हा मुख्य प्रश्न मी त्यांच्यासमोर उपस्थित केला. महाराष्ट्रात एका मराठी माणसाची तक्रार जर पोलीस नोंदवून घेत नसतील, तर ही बाब अतिशय दुर्दैवी आहे, अशी व्यथा मी त्यांच्याकडे मांडली.”
यावेळी राज ठाकरे यांनी या प्रकरणातील कायदेशीर बाजूंचा अभ्यास करत रोहित पवारांना मोलाचे मार्गदर्शन केले. सर्वोच्च न्यायालयाचे दोन महत्त्वाचे दाखले देत त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा ‘अकस्मात मृत्यूची नोंद’ (ADR) होते, तेव्हा त्या प्रकरणी रीतसर एफआयआर नोंदवणे अनिवार्य असते. पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत तक्रार दाखल करून घेण्यापासून नकार देता येत नाही. राज ठाकरे यांनी रोहित पवारांना आश्वस्त केले की, “अजित दादांना मी जवळून ओळखत होतो, आम्ही एकत्र काम केले आहे. जर एका मराठी माणसाला न्याय मिळत नसेल, तर त्यासाठी जे काही करावे लागेल, ते मी निश्चितपणे करेन.”
योगायोगाने आज मराठी भाषा गौरव दिन असल्याने, मराठी माणसाच्या हितासाठी लढणाऱ्या राज ठाकरेंनी या विषयात आपली ताकद पाठीशी उभी करावी, अशी विनंती रोहित पवारांनी केली. त्यावर “या विषयासाठी मला विचारण्याची गरज नाही, मी आणि माझा पक्ष पूर्ण ताकदीनिशी दादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,” असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे रोहित पवारांनी सांगितले.










