Rohit Pawar On Eknath Shinde : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर या प्रकरणातील गूढ अधिकच वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. मात्र, या अहवालावर आमदार रोहित पवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी तपासाच्या विश्वासार्हतेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
विमान कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न?
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, त्यांचा विरोध ‘व्हीएसआर’ (VSR), सारख्या खासगी कंपन्या किंवा थेट ‘DGCA’ या संस्थेला नाही. मात्र, या यंत्रणांच्या माध्यमातून कोणाला तरी वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असे चित्र दिसत आहे. अहवालातील तांत्रिक बाबींवर बोट ठेवले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतानाच, रोहित पवारांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागील एका विदेश दौऱ्यातील अत्यंत थरारक आणि जीवघेणा प्रसंग जगासमोर आणला आहे.
इराण-इराकच्या हवाई क्षेत्रात विमान पाडण्याचा दिला होता इशारा-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक गौप्यस्फोट करत ‘व्हीएसआर’ (VSR) या विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या निष्काळजीपणावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान त्यांचे विमान इराण आणि इराकच्या हवाई क्षेत्रात कशा प्रकारे धोक्यात आले होते, याचा धक्कादायक तपशील त्यांनी पुराव्यासह मांडला आहे.
नेमकी घटना काय होती?
१६ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांचा स्वित्झर्लंडमधील दावोस येथे अधिकृत दौरा नियोजित होता. या प्रवासासाठी राज्य सरकारने ‘व्हीएसआर’ कंपनीचे VT-CMR हे विमान भाड्याने घेतले होते, ज्यासाठी कंपनीला १.८९ कोटी रुपये अदा करण्यात आले होते. कॅप्टन अमित शुक्ला हे या विमानाचे मुख्य वैमानिक होते. मुंबईहून उड्डाण केल्यानंतर हे विमान इंधन भरण्यासाठी प्रथम बहरीन येथे थांबले.
इराण आणि इराककडून ‘विमान पाडण्याचा’ इशारा-
बहरीनहून झ्युरिचच्या (स्वित्झर्लंड) दिशेने उड्डाण केल्यानंतर विमानाने इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला. मात्र, ‘व्हीएसआर’ कंपनीकडे इराणच्या हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी आवश्यक असलेली ‘ओव्हरफ्लाइट’ परवानगी नव्हती. यामुळे इराणच्या हवाई दलाने विमानाला तातडीने माघारी फिरण्याचा आदेश दिला, अन्यथा इराणी लढाऊ विमानांद्वारे हे विमान पाडले जाईल, असा गंभीर इशारा दिला.
प्राणघातक धोका ओळखून वैमानिकाने मार्ग बदलला आणि इराकच्या हवाई क्षेत्रातून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिथेही तीच परिस्थिती उद्भवली. इराकच्या संरक्षण यंत्रणेनेही “हवाई क्षेत्र तातडीने सोडा, अन्यथा विमान पाडण्यात येईल,” अशी धमकी दिली. विमानातील इंधन कमी होत असल्यामुळे आणि दोन्ही देशांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर हे विमान पुन्हा बहरीनला परतले.
कंपन्यांच्या निष्काळजीपणावर रोहित पवारांचे प्रश्नचिन्ह-
आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा संदर्भ देत विचारले की, राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रवासाचे नियोजन करताना इतका मोठा निष्काळजीपणा कसा काय होऊ शकतो? बहरीनमध्ये सुमारे ३ तास ताटकळल्यानंतर आणि पुन्हा आवश्यक परवानग्या मिळवल्यानंतर हे विमान झ्युरिचकडे रवाना झाले. रोहित पवारांच्या मते, हा केवळ तांत्रिक बिघाड नसून संबंधित विमान कंपनीने राज्याच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेशी केलेली मोठी तडजोड होती.
सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले-
“ज्या कंपनीच्या विमानामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री दोन देशांच्या युद्धनौका किंवा लढाऊ विमानांच्या निशाण्यावर आले होते, त्याच कंपनीच्या कार्यपद्धतीकडे तपास यंत्रणा आणि डीजीसीए (DGCA) दुर्लक्ष का करत आहेत?” असा रोकडा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आता या जुन्या प्रकरणातील तथ्ये बाहेर आल्याने विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
‘व्हीएसआर’ कंपनीवर युएईची सहा महिन्यांची बंदी; कोविड काळातील लूट आणि नियमांच्या उल्लंघनावर रोहित पवारांचे खळबळजनक दावे-
रोहित पवार यांनी माहिती देताना सांगितले की, ‘व्हीएसआर’ ही कंपनी अत्यंत बेजबाबदारपणे कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संयुक्त अरब अमिरातीने (UAE) या कंपनीवर सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती. नियमानुसार, खासगी चार्टर विमान एखादी व्यक्ती किंवा संस्था संपूर्णपणे बुक करू शकते, मात्र त्यातील स्वतंत्र जागा (Seats) विकण्याचा अधिकार कंपनीला नसतो. तसे करण्यासाठी विशेष व्यावसायिक परवान्याची आवश्यकता असते. ‘व्हीएसआर’ कंपनीने या नियमाचे सरळ-सरळ उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली होती, असा दावा पवारांनी केला.
कोविड काळात रुग्णांची आर्थिक लूट-
सर्वात धक्कादायक आरोप करताना रोहित पवार म्हणाले की, “जेव्हा संपूर्ण देश आणि जग कोविड-१९ च्या भीषण संकटाचा सामना करत होते, लोक मृत्यूशी झुंज देत होते, तेव्हा ही कंपनी केवळ पैसे कमावण्याच्या नादात होती.” गंभीर रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी या कंपनीने रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ आणि अवास्तव पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. आपत्तीच्या काळात अशा प्रकारे नफेखोरी करणे हे अत्यंत अनैतिक असून, या कंपनीच्या कार्यपद्धतीवर कधीही विश्वास ठेवता येत नाही, असेही त्यांनी ठामपणे मांडले.
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सुरक्षेबाबतचा धक्कादायक संदर्भ-
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विदेश दौऱ्यात विमान पाडण्याचा इशारा देण्यात आल्याच्या घटनेचा पुनरुच्चार करत पवारांनी सांगितले की, ही कंपनी राज्याच्या सर्वोच्च नेत्यांच्या जिवाशी खेळत आहे. “आमच्याकडे जी अधिकृत माहिती आली आहे, ती आम्ही जनतेसमोर आणली आहे. ज्या कंपनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घातली जाते आणि जी कंपनी रुग्णांची लूट करते, त्याच कंपनीला महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) प्रवासाचे कंत्राट वारंवार कसे काय मिळते?” असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.
तपास यंत्रणांच्या भूमिकेवर संशय-
डीजीसीए (DGCA) आणि इतर तपास यंत्रणा या कंपनीच्या कृष्णकृत्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, असा संशयही रोहित पवारांनी व्यक्त केला. “कधी काय होईल हे सांगता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती या विमानांच्या बाबतीत आहे,” असे म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे.









