Rohit Pawar- राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र देहू येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले. त्यांनी आज संत तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर या उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत वारकरी आघाडीचे प्रमुख ह. भ. प. दत्ता महाराजही उपोषणाला बसले आहेत.
आ. रोहित पवार म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या वडिलांच्या सावकारीच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून लोकांचे कर्ज माफ केले. त्यामुळे तुकोबारायांची शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे म्हणून ओळख आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. सरकारमधील मंत्री आणि आमदार यांच्या घरात दिवाळीचा लखलखाट आहे आणि शेतकऱ्याची परिस्थिती दारात दिवा लावण्याइतकी नसल्यामुळे त्यांचे घर आज काळोखात आहे. तरीही सरकार कर्जमाफीचा निर्णय घेत नाही. डोळ्यावर झापडे आलेल्या आणि सत्तेच्या धुंदीतील सरकारला जाग करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीने लाक्षणिक उपोषण केले आहे. या सरकारला शेतकरी कर्जमाफी करण्याची सद्बुद्धी येईल, ही अपेक्षा आहे.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा–
उबाठाचा २५ ऑक्टोबरला मतदार यादीबाबत मेळावा
ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाला गती सर्व परवानग्या मंजूर !अडथळे दूर