Rupali Thombare Patil : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांनी केवळ सामाजिक क्षेत्रातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचे थेट पडसाद आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमटताना दिसत आहेत. अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडले गेल्याच्या आरोपावरून रुपाली चाकणकर यांना आधीच ‘राज्य महिला आयोग’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता; मात्र आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. पक्षाच्या महिला संघटनेतूनच त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून तात्काळ मुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पक्षांतर्गत नाराजीचा उद्रेक-
अधिकच्या माहितीनुसार, अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. ज्या महिलेवर राज राज्यातील महिलांच्या संरक्षणाची आणि न्यायाची जबाबदारी होती, त्यांचेच नाव अशा गंभीर गुन्ह्यातील संशयितासोबत जोडले जाणे हे कार्यकर्त्यांना रुचलेले नाही. यामुळे पक्षाच्या महिला आघाडीत दोन गट पडले असून, एक गट चाकणकर यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. “पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याऐवजी जर नेत्यांची नावे अशा प्रकरणांत येत असतील, तर जनमानसात चुकीचा संदेश जातो,” अशी तीव्र प्रतिक्रिया महिला पदाधिकाऱ्यांकडून उमटत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) उभी फूट? रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी रुपाली ठोंबरे आक्रमक
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (अजित पवार गट) अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या फायरब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात उघडपणे बंडाचे निशाण फडकवले असून, त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी त्या कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. आज सकाळी यासंदर्भात रुपाली ठोंबरे या सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकर यांच्या राजीनाम्याची अधिकृत मागणी करणार होत्या; मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही भेट होऊ शकली नाही. या घडामोडींमुळे पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सुनेत्रा पवारांच्या भेटीचा प्रयत्न आणि राजकीय पेच-
अधिकच्या माहितीनुसार, रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. “पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी चाकणकरांचा राजीनामा घेणे अपरिहार्य आहे,” अशी ठोंबरे यांची भूमिका आहे. हीच कैफियत मांडण्यासाठी त्यांनी सुनेत्रा पवार यांना त्या भेटणार होत्या. परंतु असे देखील बोलले जाते कि हि भेट सुनेत्रा पवार यांनी टाळली. या राजकीय संघर्षात सुनेत्रा पवार यांची मध्यस्थी महत्त्वाची मानली जात होती, परंतु भेटीच्या विलंबामुळे तणाव अधिकच वाढला आहे.
पक्षात दोन तट; समर्थक आणि विरोधक समोरासमोर
रुपाली ठोंबरे यांनी राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर पक्षात अभूतपूर्व यादवी पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन स्पष्ट गट पडले आहेत:
चाकणकर समर्थक गट: पक्षातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकर यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. त्यांनी रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठोंबरे समर्थक गट: दुसरा गट रुपाली ठोंबरे यांच्या खांद्याला खांदा लावून चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे.
पक्षांतर्गत विरोध उघड: नेतृत्वापुढील पेच-
रुपाली चाकणकर यांच्या विरोधातील असंतोष आता बंद दाराआड न राहता चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील काही ज्येष्ठ महिला पदाधिकाऱ्यांनी आणि प्रतिस्पर्धी गटाने त्यांच्या राजीनाम्यासाठी थेट पक्षश्रेष्ठींकडे दाद मागितली आहे. रुपाली ठोंबरे-पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पक्षात दोन स्पष्ट तट पडले आहेत. एकीकडे खरात प्रकरणाची कायदेशीर चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे चाकणकर यांना पदावर ठेवणे पक्षाला महागात पडू शकते, अशी भीती एका गटाला वाटत आहे.











