Sahitya Akademi Awards 2025 winners list : भारतीय साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून अकादमी आणि सांस्कृतिक मंत्रालय यांच्यातील तांत्रिक वादामुळे हे पुरस्कार रखडले होते, ज्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.
एकूण २४ भारतीय भाषांमधील साहित्यकृतींचा यात गौरव करण्यात आला असून, ३१ मार्च रोजी नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील.
मराठी साहित्याचा डंका
मराठी भाषेसाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार राजू बाविस्कर यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘काळयानिळया रेषा’या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप १,००,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल असे आहे.
Sahitya Akademi Awards 2025: इतर भाषांमधील प्रमुख विजेते
यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये कविता, कादंबरी, लघुकथा आणि आत्मचरित्र अशा विविध साहित्यप्रकारांचा समावेश आहे:
- इंग्रजी: माजी मुत्सद्दी नवतेज सरना यांच्या ‘Crimson Spring’ या कादंबरीला पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे.
- हिंदी: ज्येष्ठ लेखिका ममता कालिया यांना त्यांच्या ‘Jeete Jee Allahabad’ या आठवणींच्या संग्रहासाठी गौरवण्यात आले आहे.
- तेलगू: तेलंगणा राज्य चळवळीतील प्रमुख नेते नंदिनी सिद्धा रेड्डी यांच्या ‘Animesha’ या कवितासंग्रहाला हा बहुमान मिळाला आहे.
- मल्याळम: ज्येष्ठ लेखक एन. प्रभाकरन यांच्या ‘Maayaamanushyar’ या कादंबरीची निवड झाली आहे.
- पंजाबी: जिंदर यांच्या ‘Safety Kit’ या लघुकथा संग्रहाचा गौरव करण्यात आला आहे.
पुरस्कारांमधील राजकीय आणि सामाजिक महत्त्व
यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये अनेक सामाजिक आणि राजकीय पदर पाहायला मिळत आहेत. तामिळनाडूमध्ये स. तमिळसेल्वन यांना साहित्य समीक्षेसाठी, तर कर्नाटकात अमरेश नुगडोनी यांना जातीव्यवस्था आणि ग्रामीण हिंसाचारावर भाष्य करणाऱ्या लघुकथांसाठी पुरस्कार मिळाला आहे. तसेच ईशान्य भारतातील मणिपुरी, संथाली आणि बोडो यांसारख्या भाषांमधील लेखकांनाही राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.
रखडलेले पुरस्कार आणि झालेला वाद
डिसेंबर २०२५ मध्येच हे पुरस्कार जाहीर होणार होते, मात्र सांस्कृतिक मंत्रालयाने नावांच्या मंजुरीसाठी अडवणूक केल्याने हा सोहळा रखडला होता. या हस्तक्षेपामुळे साहित्यिक वर्तुळात मोठी नाराजी होती.
विशेष म्हणजे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी केंद्र सरकारच्या या भूमिकेला आव्हान देत स्वतःचे नवीन साहित्यिक पुरस्कारही जाहीर केले होते. अखेर, ज्युरींनी डिसेंबरमध्ये निवडलेली नावेच अंतिम करण्यात आली आहेत.
हे देखील वाचा – USCIRF Report: भारताचे अमेरिकेला जशास तसे उत्तर! ‘RSS’ आणि ‘RAW’ वर निर्बंधांची शिफारस करणारा अहवाल फेटाळला









