Sai Jadhav IMA First Woman Officer : डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीने आपल्या 93 वर्षांच्या गौरवशाली इतिहासात एका नवीन अध्यायाची नोंद केली आहे. 23 वर्षीय सई जाधव या अकॅडमीतून उत्तीर्ण होणारी पहिली महिला अधिकारी ठरली आहे.
1932 मध्ये या अकॅडमीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत 67,000 पेक्षा जास्त अधिकारी कॅडेट्स येथून बाहेर पडले आहेत, मात्र त्यात एकही महिला नव्हती. सईच्या यशाने ही प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे.
सई जाधवची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून तिच्या कुटुंबातील लष्करी परंपरेचा विस्तार आहे. तिचे पणजोबा ब्रिटीश लष्करात होते, आजोबा भारतीय लष्करात अधिकारी होते आणि वडील संदीप जाधव आजही देशाची सेवा करत आहेत. सईच्या रूपाने आता जाधव कुटुंबातील चौथी पिढी गणवेश परिधान करून देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. सईची टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली असून, या दलात सामील होणारी ती आयएमएची पहिली महिला अधिकारी ठरली आहे.
प्रशिक्षणाचा खडतर प्रवास आणि यशाची गाथा
सई जाधवचा हा प्रवास सोपा नव्हता. तिने नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर विशेष परवानगीने इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 6 महिन्यांचे अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण तिने पुरुष कॅडेट्सच्या बरोबरीने आणि त्याच निकषांवर पूर्ण केले आहे. पदवीनंतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होऊन तिने सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची पायरी गाठली आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर आयएमए मध्ये स्थान मिळवले.
सईचे प्राथमिक शिक्षण बेळगावमध्ये झाले असून वडिलांच्या लष्करी बदल्यांमुळे तिला विविध राज्यांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली. सध्या भारतीय सैन्यात महिलांसाठी अनेक नवीन मार्ग खुले केले जात आहेत. सई जाधवच्या या यशामुळे लष्करातील महिलांच्या वाढत्या महत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
देशासाठी अभिमानाचा क्षण
सई जाधवच्या खांद्यावर जेव्हा तिच्या पालकांनी अधिकृतपणे स्टार्स लावले, तो क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेक लष्करी दिग्गजांनी सईच्या या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले आहे की, हे यश येणाऱ्या पिढ्यांमधील हजारो मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल. भारतीय लष्करातील वाढत्या गुणवत्तेचे आणि बदलांचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचेही मानले जात आहे.
येत्या जून 2026 मध्ये सई जाधव आयएमए पदवीधरांसाठी राखीव असलेल्या विशेष संचलनात सहभागी होईल. एकेकाळी महिलांसाठी बंद समजले जाणारे दरवाजे आता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उघडले जाऊ शकतात, हेच सईने जगाला दाखवून दिले आहे.
हे देखील वाचा – Prithviraj Chavan : मराठी माणूस होणार देशाचा पंतप्रधान! पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर फडणवीसांचे मार्मिक भाष्य









