Salim Khan : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना १७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयात आणले असता, त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात (ICU) हलवले. सध्या त्यांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असून, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर चोवीस तास लक्ष ठेवून आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे उपचार
लीलावती रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टरांचे एक विशेष पथक सलीम खान यांच्यावर उपचार करत आहे. यामध्ये प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चव्हाण, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अजित मेनन, न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि डॉ. बिनीत अहलुवालिया यांचा समावेश आहे. रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर (व्हेंटिलेटर) ठेवणे आवश्यक आहे.
शस्त्रक्रियेच्या अफवांचे खंडन
सोशल मीडियावर सलीम खान यांच्यावर एखादी मोठी शस्त्रक्रिया पार पडल्याच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. मात्र, रुग्णालय प्रशासनाने या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. डॉक्टरांनी स्पष्ट केले की, खान यांच्यावर अद्याप कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. केवळ त्यांच्या प्रकृतीतील गुंतागुंत लक्षात घेऊन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
खान कुटुंबियांची रुग्णालयात धाव
सलीम खान यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजताच, त्यांचा मोठा मुलगा आणि अभिनेता सलमान खान याने तातडीने रुग्णालयात धाव घेतली. सलमानसोबतच त्यांच्या पत्नी सलमा खान आणि हेलन यादेखील उपस्थित होत्या. तसेच अरबाज खान, अलविरा खान आणि अर्पिता खान यांनीही रुग्णालयात जाऊन वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खान कुटुंबाव्यतिरिक्त चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. सलीम खान यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रार्थना केली जात आहे.











