Sambhaji Bhide Statement Sharad Pawar : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे पुन्हा एकदा आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
भिडे यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
नेमकी घटना काय?
संभाजी भिडे सध्या रायगड जिल्ह्यात असून त्यांची ‘धारातीर्थ यात्रा’ कर्जत परिसरातील लोहगड, भीमगड यांसारख्या किल्ल्यांवर सुरू आहे. या यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘राष्ट्रद्रोह’ असा केला. शरद पवार हे बदमाश आहेत आणि राज्यातील लवासासारखी कीड मुळापासून काढून टाकली पाहिजे, असे प्रक्षोभक विधान भिडे यांनी यावेळी केले.
राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भिडे यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. “शरद पवार हे महाराष्ट्र आणि देशासाठी आयुष्यभर झिजणारे नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा प्रकारे देशद्रोहाचा आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आणि निंदनीय आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्या विधानाचे गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र समर्थन केले आहे. “भिडे गुरुजी १०० टक्के सत्य बोलले आहेत. शरद पवारांनी एका बाजूला सहकार उभा केला आणि दुसरीकडे समाजासमाजात संघर्ष लावून दिला,” असा आरोप करत सदावर्तेंनी भिडेंची पाठराखण केली.
यापूर्वीही संभाजी भिडे यांनी अनेक महापुरुषांबद्दल आणि राजकीय नेत्यांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत, ज्यावरून राज्यात मोठे वादंग निर्माण झाले होते. आता शरद पवारांवरील या विधानाचे पडसाद येणाऱ्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.









