Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : माझ्या एका टीकेमुळे तुमचा अब्जावधींचा खर्च वाढतोय, खिसा पुरता फाटलाय- पक्षफुटीवरून संजय राऊतांच्या एकनाथ शिंदेंना जोरदार टोला..

Sanjay Raut : माझ्या एका टीकेमुळे तुमचा अब्जावधींचा खर्च वाढतोय, खिसा पुरता फाटलाय- पक्षफुटीवरून संजय राऊतांच्या एकनाथ शिंदेंना जोरदार टोला..

Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गोटात...

By: Team Navakal
Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गोटात सामील झालेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये विशेष संपर्क दौऱ्याचा प्रारंभ केला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या क्षेत्रांमधील स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार असून त्यांचे काही विद्यमान आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आमदार फुटणार असल्याच्या या वावड्यांवर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला.

“ते एक दिवस देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनाही फोडतील” – राऊतांचा उपरोधिक टोला
ठाकरे गटाचे आणखी आमदार फुटणार असल्याच्या चर्चांचा खरपूस समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, “सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आता यापुढे काही काम राहिलेले नाही, त्यामुळे ते सर्व काही फोडण्याच्याच मानसिकतेत आहेत. ज्या माणसाला एकदा खोक्यांची आणि फोडाफोडीची नशा चढते, तो काहीही बोलू शकतो. आज ते आमचे आमदार फोडल्याचा दावा करत आहेत, तर उद्या ते देवेंद्र फडणवीसांनाही फोडतील, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मला आत्ताच भेटून गेले आणि मी त्यांनाही फोडले, असा दावा करायलाही ते मागेपुढे पाहणार नाहीत.” राऊत यांनी आपला रोख अधिक आक्रमक करत म्हटले की, “ही फोडाफोडीची नशा इतकी वाढू शकते की, शेवटी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगतील. हे राजकारण सर्वांनाच ठाऊक असल्याने, सध्याच्या ‘ऑपरेशन टायगर’पासून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच सर्वाधिक सावध राहण्याची गरज आहे.”

“आम्ही मूळचेच वाघ, ‘ऑपरेशन टायगर’ची आम्हाला गरज नाही”-
शिंदे गटाकडून सूचक वक्तव्ये केली जात असताना, राऊत यांनी स्पष्ट केले की आमचे कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे सुरू नाही; कारण आम्ही जन्मापासूनच वाघ आहोत. जे आम्हाला सोडून गेले, त्यांनी स्वतःची ओळख काय होती, याचा आधी आत्मपरीक्षण करावे, असे म्हणत त्यांनी बंडखोरांना लक्ष्य केले. यासोबतच, “संजय राऊत आमच्यावर जेवढी जास्त टीका करतात, तेवढा आमचा पक्ष अधिक वाढतो,” एकनाथ शिंदे यांच्या विधानाचाही राऊतांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, “तुमचा पक्ष नक्कीच वाढू द्या, पण तो वाढवण्यासाठी तुम्हाला किती मोठी किंमत मोजावी लागत आहे, याचा विचार करा. परवाच पक्षाचा विस्तार करण्यासाठी ६ खासदारांना प्रत्येकी ५०-५० कोटी रुपये दिल्याची चर्चा आहे. माझ्या एका विधानामुळे तुमचा खर्च अब्जावधी रुपयांनी वाढतोय. आधी हजार-दोन हजार कोटी दिले आणि आता पुन्हा उर्वरित रक्कम द्यावी लागत आहे. थोडक्यात सांगायचे तर, माझ्या टीकेला उत्तर देता देता तुमचा खिसा पुरता फाटत चालला आहे,” अशी अत्यंत खोचक आणि धारदार टीका संजय राऊत यांनी केली. या राजकीय चिखलफेकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या