Sanjay Raut and PM Modi : आखाती देशांमधील इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात निर्माण झालेल्या तीव्र गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. बुधवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत, मुंबईतील मिठी नदीवर ‘नाला गॅस’ प्रकल्प उभारण्याचा खोचक सल्ला दिला. “पंतप्रधान मोदी हे एक मोठे संशोधक आहेत, त्यांनीच नाल्यातून गॅस निर्मितीचा मार्ग दाखवला होता; आता त्यांनी तो प्रयोग सिद्ध करून दाखवावा,” असे राऊत यावेळी म्हणाले.
मिठी नदीवर प्रकल्प उभारण्याचे आवाहन-
संजय राऊत यांनी आपल्या विधानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांना उद्देशून म्हटले की, मोदींच्या संकल्पनेतील या गॅस प्रकल्पाचे उद्घाटन मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर करण्यात यावे. “मिठी नदीवर अशा प्रकारचा उद्योग उभा राहिल्यास त्यातून प्रेरणा घेऊन देशभर गॅस निर्मितीची केंद्रे सुरू होतील. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाईपची व्यवस्था शिवसेना स्वतः करायला तयार आहे, फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी आवश्यक ते अनुदान मंजूर करावे,” अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी मोदींच्या या ‘विज्ञानाचा’ वापर करण्याची वेळ आता आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
देशातील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवर प्रहार-
देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना राऊत यांनी केंद्र सरकारवर जनतेला फसवल्याचा आरोप केला. “सरकारने सुरुवातीला सांगितले होते की युद्धाचा भारतावर परिणाम होणार नाही, परंतु आज परिस्थिती उलट आहे. मुंबईतील ३० टक्के हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स गॅस टंचाईमुळे बंद पडली आहेत,” असे त्यांनी नमूद केले. इतकेच नव्हे तर सातारा आणि सांगली येथील अभियांत्रिकी उद्योग, तसेच चाकणमधील वाहन उद्योग गॅसअभावी मोठ्या संकटात सापडल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भारत प्रगतीऐवजी शंभर वर्षे मागे जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
‘भारत हा उत्तम अभिनेता’ – राऊत यांचा टोला-
पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधताना राऊत यांनी अमेरिकेच्या प्रेस सेक्रेटरींच्या एका विधानाचा हवाला दिला. “अमेरिका म्हणते की भारत एक उत्तम अभिनेता आहे, हेच आज सिद्ध होत आहे,” असे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या जागतिक प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विज्ञानाला बगल देऊन नाल्यातून गॅस काढण्याच्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान होत असून, सर्वसामान्य जनता महागाई आणि टंचाईच्या चक्रव्यूहात अडकली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे मांडले.












