Sanjay Raut Criticized BJP : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दोन माजी महापौरांसह अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नाशिकचे राजकारण तापले आहे.
यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर ‘श्रीमंत भिकारी’ म्हणत सडकून टीका केली आहे. भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राऊत यांनी चक्क जागतिक नेत्यांचा संदर्भ देत टोलेबाजी केली.
“ट्रम्प आणि मॅक्रॉनलाही भाजपमध्ये घेतील”
नाशिकमधील नेते ‘विकासासाठी’ भाजपमध्ये जात असल्याचे सांगत आहेत, या प्रश्नावर राऊत यांनी उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, “हो, आता फक्त भारतीय जनता पक्षच विकासाचा पर्याय उरला आहे. आता अमेरिकेचा विकास करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प देखील भाजपमध्ये प्रवेश करतील. इतकेच नाही तर फ्रान्सचा विकास झालेला नसल्यामुळे तिथले राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन देखील भाजपमध्ये जातील. भाजप या सर्वांना आपल्या पक्षात घेऊन टाकेल.”
‘श्रीमंत भिकारी’ आणि लाचारीची लक्षणे
संजय राऊत यांनी भाजपच्या अफाट संपत्तीवरही निशाणा साधला. “भाजप हा जगातला सर्वात मोठा आणि श्रीमंत पक्ष असल्याचा दावा करतो. त्यांच्याकडे १० हजार कोटींचा निधी आहे, गौतम अदानींसारखे लोक सदस्य आहेत. तरीही त्यांना दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडावे लागतात. हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे. जेव्हा श्रीमंत माणूस भिकारी होतो, तेव्हा तो असाच लोचटपणे वागतो,” असे राऊत यांनी गिरीश महाजन यांचे नाव घेत नमूद केले.
दिवसा लाडू वाटले, रात्री भाजपमध्ये गेले!
नाशिकमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचा जल्लोष सुरू असताना, जे नेते फटाके फोडत होते आणि पेढे-लाडू वाटत होते, तेच २४ तासांच्या आत भाजपमध्ये दाखल झाले. यावर संताप व्यक्त करताना राऊत म्हणाले, “दिनकर पाटील काल गुलाल उधळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले. अशा निर्लज्ज लोकांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला जात आहे. कालपर्यंत ज्यांच्यावर गुंडगिरीचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले, त्यांनाच आज पक्षात घेताना देवेंद्र फडणवीस यांना ‘राजकीय चारित्र्य’ आठवत नाही का?”
मंत्र्यांच्या मुलावरून सरकारला सवाल
नाशिकच्या मुद्द्यासोबतच राऊत यांनी महाडमधील गुन्हेगारी प्रकरणावरूनही सरकारला घेरले. मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळूनही तो पोलिसांना सापडत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “मंत्र्यांची मुलं, भाऊ आणि बाप गुन्हे करूनही मोकाट कसे? पोलीस यंत्रणा की खाकी वर्दीतील भाजपची टोळी आहे?” असा थेट सवाल त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांना विचारला आहे.
हे देखील वाचा – Social Media Policy: भारतीय लष्कराचा मोठा निर्णय! सैनिकांना आता इन्स्टाग्राम वापरण्याची मुभा; मात्र ‘या’ कडक अटींचे करावे लागणार पालन









