Home / महाराष्ट्र / फडणवीसांनी ‘बालसाहित्य’ म्हटल्यावर शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, ‘राऊतांच्या पुस्तकातून ‘सत्तेचा गैरवापर’ उघड’

फडणवीसांनी ‘बालसाहित्य’ म्हटल्यावर शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, ‘राऊतांच्या पुस्तकातून ‘सत्तेचा गैरवापर’ उघड’

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे...

By: Team Navakal
sharad pawar devendra fadnavis

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गीतकार जावेद अख्तर उपस्थित होते. याशिवाय, खासदार साकेत गोखले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुस्तकाबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांना नाव न घेता टोला लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांच्या पुस्तकाबाबत विचारले असता ते म्हणाले होते की, “कथा-कादंबऱ्या वाचणं केव्हाच सोडलं आहे. तसंच आता बालवाड्मय वाचण्याचं माझं वयही राहिलेलं नाही. अशा गोष्टींवर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही. ते कोण आहेत? मोठे नेते आहेत का?”

शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला:

या विधानाचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले, “सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पुस्तक न वाचता ते कसं काय समजलं माहीत नाही. प्रचंड टीका संजय राऊत आणि पुस्तक याच्यावर सुरु आहे. कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, कुणी आणखी काय सांगितलं. अनेक मतं मांडली गेली. या पुस्तकात जी माहिती आहे त्यातून सत्तेचा गैरवापर कसा होतो त्याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणलं आहे. यंत्रणा कशी वागते याचं लिखाण या पुस्तकात आहे.”

संजय राऊत, अनिल देशमुख यांच्याबाबत शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या अटकेचा आणि तुरुंगातील त्यांच्या दिवसांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, राऊत यांना १०० दिवस तुरुंगात ठेवण्यात आले, ज्यामुळे तुरुंगातील परिस्थितीची जाणीव झाली. तुरुंगातील आठवणी आणि अनुभवांवर लक्ष देणे आवश्यक आहे.

यावेळी पवारांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावयाला झालेल्या अटकेचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, खडसेंचे जावई इंग्लंडमध्ये नोकरी करत असताना त्यांना तक्रारीमुळे लंडनहून यावे लागले आणि इथे आल्यावर ईडीने (ED) त्यांना अटक केली, त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांना त्रास दिला गेला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना पवार म्हणाले की, त्यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता, पण न्यायालयात तो १ कोटींवर आला. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती, असेही पवार म्हणाले.

पवारांनी आश्चर्य व्यक्त केले की सत्ताधारी पक्षातील लोकांनी पुस्तक न वाचताच त्यावर टीका केली. ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लोकशाहीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आणि सत्तेच्या गैरवापराविरुद्ध लढणाऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांतर व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या