Sanjay Raut- उबाठा पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या प्रकृतीबाबत आज एक धक्कादायक बातमी आली. खा. राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांनी दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. ते उद्याच्या मविआ मनसे मोर्चातही सहभागी होणार नाहीत. राऊत यांनी स्वतःच ही माहिती दिली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर संजय राऊतजी लवकर बरे व्हा, अशी पोस्ट केली.
मुंबई पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्यामुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. खा. संजय राऊत दररोज सकाळी पत्रकारांशी संवाद साधतात. आज सकाळी त्यांची पत्रकार परिषद न झाल्याने अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी शंका उपस्थित केली. 15 दिवसांपूर्वीच संजय राऊत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची

रक्ततपासणी करण्यात आली होती. त्यामुळेच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाटत असतानाच दुपारी राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक निवेदन अपलोड करत आपल्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचे सांगितले. आपल्या पत्रात त्यांनी म्हटले की, सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती की आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे नाईलाज आहे. मला खात्री आहे, मी ठणठणीत बरा होऊन नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.
खा. राऊतांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. त्यांच्या या भावनिक निवेदनामुळे खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. याच काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राऊत सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. 2019 मध्ये संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात तीन स्टेंट बसवण्यात आले होते. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्सवर संदेश प्रसारित करत म्हटले की, संजय राऊत काळजी घ्या, लवकर बरे व्हा! पत्रकार परिषद घेण्यासाठी पुन्हा मैदानात या. राऊतांची प्रकृती सुधारावी यासाठी देवाकडे प्रार्थना. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राऊत यांच्या ट्विटवर बोलताना म्हणाले की, दोन महिने खोटे बोलायचे नाही, असे कदाचित त्यांनी ठरवले असेल.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
राज ठाकरेंचा मोठा इशारा! शिवरायांच्या किल्ल्यांवर ‘नमो पर्यटन केंद्र’ उभारल्यास फोडून टाकणार









