Sanjay Raut : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला असून भाजपचे हे आंदोलन म्हणजे निव्वळ ‘ढोंग’ असल्याची टीका त्यांनी केली आहे.
भाजपच्या राष्ट्रभक्तीवर राऊतांचे प्रश्नचिन्ह
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र हा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचाच आहे आणि तो कायम राहील, हे सांगण्यासाठी महाराष्ट्राला भाजपच्या मार्गदर्शनाची किंवा प्रमाणपत्राची मुळीच आवश्यकता नाही. ब्रिटिशांविरुद्धच्या ऐतिहासिक लढ्यात भाजप किंवा त्यांच्या विचारसरणीचे लोक कोठेही अस्तित्वात नव्हते. त्यामुळे आज त्यांनी शिवरायांच्या नावावर राजकारण करणे हा दांभिकपणा आहे.”
रामनाथ कोविंद यांच्या वक्तव्याचा दिला दाखला
भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवताना राऊत यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विधानाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “सध्याच्या भाजप कार्यकर्त्यांना कदाचित आपला इतिहास आणि पक्षाची भूमिका ठाऊक नसावी. भाजप पुरस्कृत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वतः टिपू सुलतानची प्रशंसा केली होती. १७४९ मध्ये ब्रिटिशांशी लढताना टिपू सुलतान धारातीर्थी पडले, त्यांना अनेक इतिहासकार ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यातील पहिले हुतात्मा मानतात. जर तुमच्याच नेत्यांनी त्यांची स्तुती केली असेल, तर आता आंदोलन कशासाठी?”
शिवराय हे महाराष्ट्राचे चिरंतन दैवत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा विषय काढत राऊत यांनी स्पष्ट केले की, शिवराय हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात स्थिरावलेले दैवत आहेत. राजकीय लाभ उठवण्यासाठी भाजपने अशा विषयांचे भांडवल करणे थांबवावे. ब्रिटिशांच्या काळात ज्यांचा संघर्षशून्य इतिहास आहे, त्यांनी इतरांना राष्ट्रभक्ती शिकवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.










