Sanjay Shirsat on Farmer Protest Video : कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी आणि तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर १० ऑक्टोबरपासून एका शेतकऱ्याने बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणाचा नववा दिवस असताना, संबंधित व्यक्तीने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या निवासस्थानी जाऊन उपोषण मागे घेतल्याची विचित्र घटना समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर, पालकमंत्र्यांनी उपोषणस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेण्यास वेळ का काढला नाही? असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. यावरून संजय शिरसाटांवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यावर आता संजय शिरसाट यांनी घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? याबाबत स्पष्टीकरण दिलंय.
संजय शिरसाट म्हणाले की, असे समजण्याचे काही कारण नाही. मी त्या दिवशी सायंकाळी सहा वाजता मुंबईवरून इकडे आलो आणि उपोषणकर्त्याचे वडील हे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते होते, त्यांनी इच्छा व्यक्त केली की, उपोषणकर्त्याला माझ्या हातून उपोषण सोडायचे आहे. त्यांनी तहसीलदारांकडे तसा आग्रह धरला. तेव्हा तहसीलदारांनी आपण जाऊया, असे म्हटले. त्यामुळे ते माझ्याकडे उपोषणकर्त्याला घेऊन आले. त्यांच्या पत्नी, त्यांच्या वहिनी आणि आमचे कार्यकर्ते तिथे सोबत होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही त्यांना तासभर येथे बसवले होते. सगळ्या गोष्टींची चर्चा केली आणि त्यांचे उपोषण सोडवले, असे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले. एखाद्या शेतकऱ्याने म्हटले की, मला पालकमंत्र्यांना भेटायचे आहे तर त्याला नाही कसे म्हणणार? असा थेट सवाल देखील
संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.
पुढे त्यांना प्रश्न विचारला कि तुमच्या पीएने उपोषणकर्त्यांना सांगितले की, साहेबांना वेळ नाही. त्यामुळे तुम्ही इकडे, या अशी माहिती समोर आली आहे. याबाबत संजय शिरसाट म्हणाले की, असे काहीही नाही, माझे सगळे कार्यक्रम होते ते आल्यानंतर एक तास इकडे बसले होते. माझं त्यांच्याशी चांगलं बोलणं झालेलं आहे. यात कोणताही वाद होण्याचे काहीच कारण न्हवते असे देखील ते म्हणाले.
पुढे शिरसाटानां तुम्हाला हे असंवेदनशील वाटते का असे विचारले असता ते म्हणाले मला यात काही असंवेदनशील वाटत नाही. जे घडले नाही त्यात असंवेदनशीलता कुठून आली, असे देखील संजय शिरसाट यांनी म्हटले.
हे देखील वाचा –
Bihar Polls : बिहार निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज संपली..