राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार!- शिरसाट संतापले

    मुंबई- शिवसेना (ठाकरे गट) मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरुममधील पैशाने भरलेल्या बॅगेचा एक व्हिडीओ शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शेअर केला. या व्हिडीओवर टीका होऊ लागल्यानंतर शिरसाटांनी हा व्हिडीओ त्यांचा असल्याचे मान्य केले मात्र, त्या बॅगेत पैसे नसून कपडे असल्याचा दावा केला. मात्र, आज त्यांनी हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असून या प्रकरणी संजय राऊतांविरुद्ध दाखल करणार असल्याचे सांगितले.

    शिरसाट यांनी हे वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, व्हिडिओ मी चोरून काढलेला आहे का? मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, हा व्हिडिओ त्यांच्या घरातला आहे. ते कुठे राहतात हे मला माहीत नाही. शिरसाट हे अतिविशिष्ट व्यक्ती आहेत, ते महात्मा आहेत, ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. एक मंत्री आक्षेपार्ह अवस्थेत पैशांच्या बॅगांसोबत बसलेला आहे. सिगारेटचे झुरके मारत आहे. हे चित्र आमचे नाही, ही महाराष्ट्राची प्रतिमा आहे. या सरकारची प्रतिमा काय आहे, हेच त्या व्हिडिओतून दिसत आहे.