Home / महाराष्ट्र / PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये जाणार

PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये जाणार

PCMC Election: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरातील सर्वात...

By: Team Navakal
PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये जाणार
Social + WhatsApp CTA

PCMC Election: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरातील सर्वात मोठे शिलेदार आणि माजी लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफ्लकी राजीनामा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, वाघेरे यांनी आता भाजपची वाट धरली असून, लवकरच त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

निवडणूक आयोगाने 15 जानेवारी रोजी मतदानाची तारीख जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. ठाकरे गटानेही शहरात जोरदार रणनीती आखली होती, मात्र ज्यांच्या खांद्यावर शहराची जबाबदारी होती, त्या संजोग वाघेरे यांनीच साथ सोडल्याने पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

वैयक्तिक कारणांचे दिले निमंत्रण

संजोग वाघेरे यांनी आपला राजीनामा शिवसेनेचे संपर्क नेते तथा आमदार सचिन अहिरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. “काही अपरिहार्य वैयक्तिक कारणांमुळे मी सध्या माझी जबाबदारी अपेक्षेप्रमाणे पार पाडू शकत नाही. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन मी शहराध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. हा निर्णय केवळ वैयक्तिक कारणांपुरता मर्यादित असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी त्यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झाला आहे.

अजित पवारांचे निकटवर्तीय ते भाजप प्रवेश

संजोग वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) निष्ठावान मानले जायचे. त्यांनी राष्ट्रवादीकडून महापौरपद आणि शहराध्यक्षपदही भूषवले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून मावळमधून निवडणूक लढवली होती. पराभवानंतर त्यांच्याकडे शहराची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांची पत्नी उषा वाघेरे या आधीच राष्ट्रवादीत (अजित पवार गट) सक्रिय असल्याने ते पुन्हा स्वगृही परततील, अशी चर्चा होती. पण आता त्यांनी राष्ट्रवादीऐवजी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला आहे.

लांडगे-काटे आणि वाघेरे यांची गुपित बैठक

भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि संजोग वाघेरे यांच्यातील कौटुंबिक नातेसंबंध सर्वश्रुत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार लांडगे आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासोबत वाघेरेंच्या गुप्त बैठका सुरू होत्या. या बैठकांमधूनच भाजप प्रवेशाची पटकथा लिहिली गेली. अखेर वाघेरे यांनी “मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे,” असे स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ठाकरे गटासमोर मोठे आव्हान

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाघेरेंच्या जाण्याने ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाली आहे. वाघेरे यांच्याकडे शहराध्यक्षपद असल्याने साहजिकच निवडणुकीची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. आता त्यांच्या तोडीचा अनुभवी आणि ताकदवान नेता शोधण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसमोर असणार आहे. दुसरीकडे, संजोग वाघेरे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आपली सत्ता टिकवण्यासाठी भाजपला मोठे बळ मिळणार आहे.

हे देखील वाचा – उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक; मतदानानंतर पक्षात फक्त पिता-पुत्रच उरतील; रावसाहेब दानवेंचा घणाघात

Web Title:
संबंधित बातम्या