Santosh Deshmukh Case : संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवून देणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चाटे याला तब्बल १४ महिन्यांच्या कारावासानंतर प्रथमच काही तासांसाठी जेलबाहेर येण्याची परवानगी मिळाली आहे. आपल्या दिवंगत भावाच्या उत्तरकार्यासाठी (१२ व्याच्या विधीसाठी) उपस्थित राहता यावे, याकरिता चाटेने न्यायालयात विनंती अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने अटी-शर्तींसह हा तात्पुरता दिलासा दिला आहे.
न्यायालयीन प्रक्रिया आणि सरकारी पक्षाचा विरोध-
जयराम चाटे याच्या भावाचे २ मार्च रोजी निधन झाले होते. कुटुंबातील या दुःखद घटनेनंतर, धार्मिक विधी पार पाडण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी म्हणून चाटेच्या वकिलांनी जिल्हा व विशेष न्यायालयात रीतसर अर्ज दाखल केला होता. ६ मार्च रोजी या अर्जावर दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, आरोपीची कौटुंबिक परिस्थिती आणि धार्मिक भावना विचारात घेऊन न्यायालयाने कडक निर्बंधांसह ही विनंती मान्य केली.
कडक अटी आणि पोलीस बंदोबस्त-
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जयराम चाटेला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच आपल्या मूळ गावी, म्हणजेच ‘तांबवा’ येथे उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पोलीस बंदोबस्तासाठी येणारा सर्व खर्च स्वतः आरोपीलाच सोसावा लागणार आहे. बीड जिल्हा कारागृहातून पोलीस बंदोबस्तात त्याला बाहेर काढण्यात आले असून, विधी संपल्यानंतर तातडीने पुन्हा कारागृहात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासनासमोर सुरक्षेचे आव्हान-
संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने, जयराम चाटे तांबवा गावात पोहोचल्यानंतर तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सतर्क आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपीच्या सुटकेवरून धनंजय देशमुख आक्रमक; कायदा व सुव्यवस्थेबाबत उपस्थित केले गंभीर प्रश्न-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चाटे याला भावाच्या अंत्यविधीसाठी न्यायालयाने काही तासांची परवानगी दिल्यानंतर, मयत सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून आरोपीला बाहेर सोडल्यामुळे गावातील शांतता भंग होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य आणि सामाजिक संताप-
धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, हे केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित प्रकरण नसून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागलेले आहे. गेल्या सव्वा वर्षांपासून या प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यांनी केलेल्या कृत्याची भीषणता संपूर्ण राज्याने पाहिली आहे. आरोपी अत्यंत प्रवृत्तीचे असून, अशा स्थितीत त्यांना अशा प्रकारे सवलत मिळणे पीडित कुटुंबासाठी क्लेशदायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कायद्याच्या चौकटीत सुरक्षेचा प्रश्न-
न्यायालयात या अर्जावर सुनावणी सुरू असताना, पीडित पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी देखील आपली भूमिका मांडली होती. जयराम चाटे याला गावी जाण्याची परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेची गंभीर समस्या उद्भवू शकते, असा इशारा त्यांनी दिला होता. याच मुद्द्याचा पुनरुच्चार करताना धनंजय देशमुख म्हणाले, “आरोपीच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला ही बाब न्यायालयासमोर मांडली गेली, परंतु या विधीच्या काळात जर काही अनुचित प्रकार घडला किंवा तणाव निर्माण झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कोण स्वीकारणार?”
प्रशासनाकडून ठोस हमीची मागणी-
धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, जर न्यायालयाने आरोपीला गावात येण्याची परवानगी दिली असेल, तर तिथल्या सुरक्षेची आणि कायदा-सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे.











