Kolhapur Election: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘थेट पाईपलाईन’ योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी नवीन पद्धत अवलंबली.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या शैलीत त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) सादर करून या योजनेचा आजवरचा प्रवास आणि त्यातील अडथळे जनतेसमोर मांडले.
योजनेतील विलंब आणि परवानग्यांचे वास्तव
सतेज पाटील यांनी सांगितले की, केवळ निवडणूक आली की या मुद्द्याचे राजकारण केले जाते. योजनेच्या मंजुरीपासून ते कामाच्या पूर्णत्वापर्यंत एकूण 55 बैठका झाल्या आहेत. 2014 मध्ये सत्ता बदलल्यानंतर अनेक कामांना स्थगिती देण्यात आली होती, तरीही आम्ही आधीच 170 कोटींचा निधी मिळवला होता.
वन विभागाने 508 दिवस आणि पाटबंधारे विभागाने 202 दिवस परवानग्या न दिल्याने योजनेचे काम लांबणीवर पडले. जर या योजनेत भ्रष्टाचार झाला असता, तर केंद्र सरकारने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी निधी दिला असता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या आरोपांचा समाचार
चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना सतेज पाटील म्हणाले की, “दादांना कोणीतरी चिठ्ठी दिली आणि त्यांनी वाचून दाखवली, नाहीतर ते असे आरोप करणार नाहीत.” गेल्या 8 वर्षांपासून राज्यात भाजपचे सरकार असताना त्यांनी या योजनेची चौकशी का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला. विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे खासदार ज्या पाण्याचा वापर करतात, ते थेट पाईपलाईनचेच आहे, असा दावाही त्यांनी केला.
वितरण व्यवस्थेतील गोंधळ आणि दंडाचा विषय
योजनेचे पाणी पुईखडीपर्यंत आणण्याची जबाबदारी पूर्ण झाली आहे, परंतु शहरात पाणी वितरणाचे काम ‘अमृत योजने’अंतर्गत रखडले आहे. सतेज पाटील यांनी खळबळजनक आरोप केला की, या वितरणाचे काम सांगलीचे भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या नातेवाईकाकडे (भावाकडे किंवा मुलाकडे) आहे. कामात दिरंगाई केल्यामुळे महापालिकेने या ठेकेदाराला 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी हा दंड वसूल करण्यासाठी मदत करावी, असा खोचक टोला सतेज पाटील यांनी लगावला.
माझ्यावर टीका जरूर करा, पण कोल्हापूरकरांना पाण्यासाठी वेठीस धरू नका, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले. तसेच या योजनेचे नुकसान होऊ नये म्हणून निवडणुकीच्या काळात कडक पोलीस बंदोबस्त देण्याची मागणीही त्यांनी केली.
हे देखील वाचा – “विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील”; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानाने लातूरमध्ये संतापाची लाट, काँग्रेसचा पलटवार









