Satish Bhosale : भाजप आमदार सुरेश धस यांचा खंबीर समर्थक म्हणून ओळखला जाणारा सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ हा तब्बल एका वर्षानंतर कारागृहाबाहेर आला आहे. शिरूर कासार येथील मारहाण प्रकरण आणि ढाकणे कुटुंबावरील हल्ल्याच्या आरोपाखाली तो गेल्या वर्षभरापासून अटकेत होता. नुकतीच न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली असून, बाहेर आल्यानंतर त्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत संताप आणि दुःख व्यक्त केले आहे.
“माझी वर्षभराची कमाई आणि संसार उध्वस्त झाला”
कारागृहातून सुटल्यानंतर सतीश भोसले जेव्हा शिरूर कासार येथील आपल्या निवासस्थानी पोहोचला, तेव्हा तेथील दृश्य पाहून त्याला मोठा धक्का बसला. वनविभागाने अतिक्रमणाच्या नावाखाली त्याचे ‘ग्लास हाऊस’ जमीनदोस्त केले होते. आपला उध्वस्त झालेला संसार पाहताना तो भावूक झाला. “गेल्या वर्षभरात माझ्या आयुष्याची संपूर्ण कमाई मातीला मिळाली आहे. माझे कुटुंब रस्त्यावर आले असून लहान मुले आणि वृद्ध आई-वडिलांच्या डोक्यावर आज छप्परही उरलेले नाही. मला लक्ष्य करून माझ्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले,” अशी प्रतिक्रिया भोसले याने माध्यमांशी बोलताना दिली.
न्यायव्यवस्थेवर व्यक्त केला विश्वास
न्यायालयाने दिलेल्या निकालावर समाधान व्यक्त करताना सतीश भोसले म्हणाला की, “अखेर सत्याचा विजय झाला आहे. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे होते आणि जे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते, त्यांची सत्यता संशयास्पद होती. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता आणि आज मला न्याय मिळाला आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जो अन्याय झाला, तो आता जगासमोर आला आहे.”
काय होते नेमके प्रकरण?
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर होता, तेव्हा सतीश भोसलेचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये तो एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण करताना दिसत होता. या घटनेची दखल घेत पोलीस प्रशासनाने त्याला अटक केली होती. या व्यतिरिक्त शिरूर तालुक्यातील पिता-पुत्रांना मारहाण करणे आणि घरात वन्य प्राण्यांचे (हरीण) मांस आढळल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गतही त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
लॅविश लाइफस्टाइल आणि रिल्सचा वाद
सतीश भोसले हा त्याच्या राजेशाही जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असायचा. गाडीच्या डॅशबोर्डवर पैशांची बंडले ठेवणे, हेलिकॉप्टरमधून होणारी त्याची एन्ट्री आणि पंचतारांकित हॉटेल्समधील वास्तव्याचे रिल्स समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पाहिले जात असत.










