Semolina Recipe : मराठवाड्यातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीत “तेलची” या गोड पदार्थाला विशेष स्थान आहे. लग्नसमारंभ, सण-उत्सव तसेच नववधूच्या पाठवणीच्या वेळी आवर्जून बनवला जाणारा हा पदार्थ आजही घराघरात जपला जातो. कुरकुरीत , गोड चव आणि दीर्घकाळ टिकण्याची क्षमता यामुळे तेलची हा केवळ पदार्थ नसून परंपरेचा एक गोड भाग मानला जातो.
तेलचीचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात – रवा तेलची आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली तेलची. काही भागांत याला “संजोरी” असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ बनवण्याची परंपरा आहे आणि त्यात तेलचीचा समावेश अनिवार्य मानला जातो.
नववधूच्या पाठवणीच्या वेळी तिला दिल्या जाणाऱ्या गोड पदार्थांमध्ये तेलची हा मुख्य घटक असतो. पूर्वी लामबचा रस्ता असल्याने नववधूसोबत तेलची दिली जात असे. कारण हा पदार्थ खूप काळ टिकतो आणि पोट भरते. इतर अनेक पदार्थांसोबत दिली जाणारी ही तेलची केवळ चवीपुरती मर्यादित नसून, नव्या आयुष्यातील गोड सुरुवातीचे प्रतीक मानली जाते. तसेच, दीर्घकाळ टिकत असल्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उत्तम नाश्ता ठरतो.
रवा तेलची रेसिपी
साहित्य:
रवा – 2 कप
गूळ – 1.5 कप (किसलेला) किंवा साखर
तूप / तेल – ½ कप
खसखस – 2 चमचे
सुका मेवा (बदाम, काजू) – ¼ कप
वेलची पूड – 1 चमचा
दूध – आवश्यकतेनुसार
गव्हाचे पीठ -२ कप आणि मैदा – १ कप
कृती:
कढईत तूप घालून रवा मंद आचेवर सोनसळी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
वेगळ्या भांड्यात गूळ किंवा साखर आणि थोडे पाणी घालून पाक तयार करा.
या पाकात भाजलेला रवा घालून चांगले मिसळा.
त्यात खसखस, सुका मेवा आणि वेलची पूड घालून मिश्रण ८- ९ तास भिजवत ठेवा.
काही तासांनी सारण एकजीव करत राहावे म्हणजे साखर मुरूते आणि गोडवा चंगळ येतो (सारण तयार होईल).
गव्हाचे पीठ आणि मैद घेऊन त्यात पाणी घालून मध्यम घट्ट पीठ मळून घ्या.
पिठाचे आणि सारणाचे छोटे गोळे तयार करा.
पिठाची पुरी लाटून त्यात सारण भरून कडा बंद करा.
हलक्या हाताने पुन्हा लाटून मध्यम जाडीची चकती तयार करा.
कढईत तेल गरम करून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.
विशेष टिप्स:
तेलची पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात २–३ आठवडे टिकते.










