शहीद संदीप गायकरना साश्रूनयनांनी निरोप, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

अहिल्यानगर – जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले लष्करी जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या अकोले तालुक्यातील मूळ गावी ब्राम्हणवाडा येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या जनसमुदायाने साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी ब्राम्हणवाडासह परिसरातील अनेक गावांमधून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

शहीद संदीप गायकर यांचे पार्थिव काल त्यांच्या गावी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी, आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. आज सकाळी फुलांनी सजवलेल्या लष्करी ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. सह्याद्री महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी फुलांनी सजवलेल्या मंचकावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.

सर्वात आधी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यासह अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर लष्करी जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आपल्या सहकाऱ्याला मानवंदना दिली. राज्याच्या पोलीस दलाकडूनही बिगुल वाजवून व हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. लष्करी अधिकाऱ्यांनी गायकर यांच्या पार्थिवावरील तिरंगा त्यांच्या पत्नीच्या हाती दिला, त्यावेळी त्यांनी दुखावेगाने आक्रोशातही भारत माता की जयची घोषणा दिली. संदीप गायकर यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला, तेव्हा शहीद संदीप गायकर अमर रहेच्या घोषणांनी परिसर भरून राहिला होता.

असे झाले शहीद

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड भागातील जंगलात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती १७ मराठा बटालियनला मिळाली. त्यानंतर या बटालियनने बुधवारी रात्रीपासून या भागात शोधमोहीम राबवली. पहाटे दहशतवाद्यांचा सुगावा लागल्यावर जवानांनी गोळीबार सुरू केला. त्याच वेळी दहशतवाद्यांकडून आलेली एक गोळी जवान संदीप गायकर यांना लागली. त्यातच ते शहीद झाले. या कारवाईत मराठा बटालियनने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.