Shahu Maharaj Chhatrapati on Tipu Sultan : राज्यात सध्या टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका विधानानंतर सुरू झालेल्या वादात आता कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी उडी घेतली आहे.
टिपू सुलतान यांनी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपले कार्य केले, असे विधान शाहू महाराजांनी केल्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले शाहू महाराज छत्रपती?
माध्यमांशी बोलताना शाहू महाराज यांनी स्पष्ट केले की, शिवरायांची कार्यपद्धती, त्यांचे प्रशासन आणि शत्रूशी लढण्याचे कौशल्य हे जगासाठी आदर्श आहे. ते म्हणाले, “म्हैसूरच्या टिपू सुलतानांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन काम करण्याचे ठरवले होते. आपण सर्वजण ब्रिटिशांविरुद्ध लढत होतो आणि टिपू सुलतान देखील त्यांच्याशीच दोन हात करत होते. त्यावेळी ब्रिटिशांना कोणी साथ दिली, हे इतिहास तपासून पाहण्याची गरज आहे.” महाराजांनी पुढे असेही म्हटले की, इतिहासातील घटनांकडे वादाच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यातून केवळ प्रेरणा घेतली पाहिजे.
हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण
या वादाची सुरुवात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाने झाली होती. त्यांच्यावर भाजपने शिवरायांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याचा आरोप केला होता.
यावर स्पष्टीकरण देताना सपकाळ म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अद्वितीय आहेत, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. टिपू सुलतानांनी महाराजांकडून प्रेरणा घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला, एवढेच मला सांगायचे होते. भारतीय संविधानातही टिपू सुलतानांची प्रतिमा आहे, याची दखल घेतली पाहिजे.”
राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी
मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरांच्या दालनात लावलेल्या टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून हा वाद विकोपाला गेला आहे. भाजपच्या एका आमदाराने सपकाळ यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतल्याने वातावरण अधिकच चिघळले होते. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी केलेली मांडणी ही काँग्रेससाठी दिलासादायक असली, तरी विरोधकांकडून यावर आता कशी प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.










