Home / महाराष्ट्र / Shalarth ID Scam : अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढली; ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात सहभागाचा संशय, राजकीय संबंधांमुळे खळबळ

Shalarth ID Scam : अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढली; ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात सहभागाचा संशय, राजकीय संबंधांमुळे खळबळ

Shalarth ID Scam : अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांनी महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणींत आता...

By: Team Navakal
Shalarth ID Scam
Social + WhatsApp CTA

Shalarth ID Scam : अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांनी महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणींत आता आणखी भर पडली आहे. राज्याला ग्रासलेल्या ‘शालार्थ आयडी’ (Shalarth ID) घोटाळ्यात खरातचा थेट सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या दिशेने तपास सुरू केला असून, खरातच्या भावाचा या घोटाळ्यातील संबंध आता रडारवर आला आहे.

दिलीप खरात यांच्या ‘शालार्थ आयडी’ची होणार चौकशी-
अशोक खरात यांचा भाऊ दिलीप खरात हे सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांना मिळालेला ‘शालार्थ आयडी’ कायदेशीर प्रक्रियेतून मिळाला की तो बनावट आहे, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, २०२२ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात, अशोक खरातने आपल्या प्रभावाचा वापर करून हा आयडी मिळवून दिल्याची चर्चा शिक्षण विभागात रंगली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आता दिलीप खरात यांची चौकशी करण्याची शक्यता असून, यातून शिक्षण विभागातील काही महत्त्वाच्या फाईल्स बेकायदेशीरपणे मंजूर केल्याचे धक्कादायक वास्तव समोर येऊ शकते.

राजकीय संबंध आणि दबावाचे राजकारण:
या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. अशोक खरात आणि दीपक केसरकर यांच्यातील कथित संबंधांमुळेच नियमांना बगल देऊन काही कामे मार्गी लावली गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. शिक्षण विभागातील काही फाईल्स खरातच्या दबावाखाली मंजूर करण्यात आल्याची चर्चा असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जरी अधिकृतरित्या अद्याप कोणताही पुरावा समोर आला नसला, तरी पोलिसांच्या रडारवर असलेल्या खरातशी संबंधित व्यक्तींकडून मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रूपाली चाकणकर यांच्या अडचणींत वाढ-
या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नावही सातत्याने चर्चेत आहे. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि नंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. ‘शिवनिका संस्थान’च्या विश्वस्तांसोबतच चाकणकर यांनाही विशेष तपास पथकाने (SIT) समन्स बजावले असून, त्यांची सखोल चौकशी होणार आहे. भोंदू बाबाला दिलेल्या कथित पाठिंब्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निलेश चाकणकर यांच्यावरील आरोप आणि न्यायालयीन लढा-
दुसरीकडे, रूपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर हे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे त्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या