Home / महाराष्ट्र / Mumbai Mahapalika : मुंबई महापालिकेत शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा ! ठाकरेंना धक्का ! सत्तेसाठी तडजोड की नवे राजकारण?

Mumbai Mahapalika : मुंबई महापालिकेत शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा ! ठाकरेंना धक्का ! सत्तेसाठी तडजोड की नवे राजकारण?

Mumbai Mahapalika : उबाठा आणि मनसेसोबत मुंबई महापालिकेची (Mumbai Mahapalika ) निवडणूक आघाडीत लढवलेल्या शरद पवार गटाने आता महायुतीतील शिंदे...

By: Team Navakal
BMC Election Result 2026
Social + WhatsApp CTA

Mumbai Mahapalika : उबाठा आणि मनसेसोबत मुंबई महापालिकेची (Mumbai Mahapalika ) निवडणूक आघाडीत लढवलेल्या शरद पवार गटाने आता महायुतीतील शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्याने ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसला आहे. शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदे गटाला पाठिंबा देत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत शरद पवार गटाने उबाठाची साथ सोडून महायुतीला पाठिंबा दिल्याने याचा महाविकास आघाडीवरच मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलीनीकरणाची चर्चा चालू असताना आता मुंबई पालिकेत हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र बाकावर बसणार आहेत. यामुळेही या पाठिंब्याची चर्चा होत आहे.


 मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी उद्या 7 फेब्रुवारी रोजी अर्ज स्वीकारले जाणार असून, 11 फेब्रुवारीला नव्या महापौराची अधिकृत घोषणा होणार आहे. मात्र त्याआधीच महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 मधून निवडून आलेले शरद पवार राष्ट्रवादीचे अजित रावराणे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर रावराणे यांनी महायुतीच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या या भूमिकेमुळे महापालिकेत शिंदे गटाची ताकद वाढली आहे.


आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना अजित रावराणे म्हणाले की, प्रभागातील विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. सत्ताधार्‍यांच्या सोबत राहिल्याशिवाय विकास शक्य नाही. तसेच प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी महायुती सरकारकडून सहकार्याचे आश्वासन मिळाल्याने हा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर शोककळा पसरली असून, या परिस्थितीत या विषयावर शरद पवार यांच्याशी तत्काळ चर्चा करणे योग्य वाटले नाही. मात्र शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार यांची भेट होणार असून, त्यावेळी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहे. अजित रावराणे यांच्या महायुतीतील प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काहींनी हा निर्णय व्यक्तिगत राजकारणाचा भाग असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी राजकीय तडजोड करण्याच्या शरद पवार गटाच्या भूमिकेवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवलीत पालिकेत मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे जाहीर केल्यावर उबाठाने नाराजी व्यक्त केली होती. या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घ्यावी लागते, अशी प्रतिक्रिया देत आपल्या भूमिकेचे समर्थन केले होते. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सोयीची भूमिका घेऊन उबाठाला दुसरा धक्का दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

नाशिक पालिकेत मनसेचा नगरसेवक
शिंदे-भाजपासोबत! उबाठाची साथ सोडली

नाशिक महानगरपालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये मोठा आणि निर्णायक बदल झाला. निवडणुकीत शिंदे व अजित पवार गटाने युती करून भाजपाला बाजूला ठेवले होते. मात्र आता मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिंदे गटाला पाठिंबा देत भाजपासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. मनसेने उबाठाची साथ सोडली आहे. यापूर्वी कल्याण- डोंबिवलीमध्ये मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. या पालिका निवडणुकीत भाजपाने 72 जागा, शिंदे गटाने 26, उबाठाने 15, अजित पवार गटाने 4, काँग्रेसने 3 तर मनसेने 1 जागा जिंकली होती. या समीकरणांमुळे ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे. याबाबत नगरसेविका मयुरी पवार यांचे पती आणि मनसेचे नेते अंकुश पवार म्हणाले की, नाशिक महापालिकेत मनसेचा एक निवडणूक नगरसेवक निवडून आलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही आमचा स्वतंत्र गट स्थापन केला होता. परंतु नाशिकमध्ये आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. त्यात विकासकामे होणे गरजेचे आहे. कुंभमेळा आमच्याच प्रभागात भरतो. त्यामुळे विकासकामे झाली पाहिजेत या दृष्टीने आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि आ. सीमा हिरे  यांनी सांगितले की, कोणताही पक्ष हा निवडणुकीपर्यंत विरोधी असतो. त्यानंतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन शहर विकासाचा विचार केला पाहिजे.

शिंदेंची हिंदुत्ववादी शिवसेना
मालेगावात एमआयएमसोबत?

उबाठाला डिवचण्यासाठी हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणार्‍या शिंदे गटाने मालेगाव महानगरपालिकेत एमआयएमसोबत हातमिळवणी केल्याची जोरदार चर्चा सुरू होत आहे. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे आणि एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यात झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्या होणार्‍या विशेष सभेआधीच या भेटीमुळे महापौरपदाची सर्व गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या स्थितीत मालेगाव महापालिकेत एमआयएमचे 21, शिंदे गटाचे 18, भाजपाचे 2, काँग्रेसचे 3 आणि इस्लाम पार्टीचे 35 नगरसेवक आहेत. महापौरपदासाठी 43 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक असून, कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. इस्लाम पार्टीतील दोन नगरसेवक पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तसेच भाजपाकडील दोन नगरसेवक कोणाची साथ देतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. हे चार नगरसेवक शिंदे गट-एमआयएम आघाडीच्या बाजूने गेले, तर शिंदे गट 18, एमआयएम 21, भाजपा 2 आणि इस्लाम पार्टीतील नगरसेवक असे मिळून एकूण संख्याबळ 43 हून अधिक होऊ शकते. या परिस्थितीत शिंदे गटाचा महापौर आणि एमआयएमचा उपमहापौर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भाजपाने एमआयएमसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे सेनेची अडचण होण्याची शक्यता आहे. हिंदुत्ववादी शिंदे सेना आणि एमआयएम यांची संभाव्य जवळीक मालेगावच्या राजकारणातील मोठी उलथापालथ ठरू शकते.

कोल्हापुरात प्रथमच महायुतीची सत्ता
महापौरपदी रूपाराणी निकम

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची बहुमताने निवड करण्यात आली. यामुळे कोल्हापूरमध्ये प्रथमच महायुतीची सत्ता स्थापन झाली. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत रूपाराणी निकम यांना 46  मते तर काँग्रेसचे उमेदवार सचिन मारुती शेंडे यांना 35 मतांवर समाधान मानावे लागले. उपमहापौरपदासाठी झालेल्या  निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांनी काँग्रेसचे दुर्वास परशुराम कदम यांचा पराभव केला. या निवडणुकीत जरग यांना 46, तर कदम यांना 35 मते मिळाली. रुपाराणी निकम आणि अक्षय जरग यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी वाद्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

—————————————————————————————————————————-

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या