Sharad Pawar : येत्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी पाहायला मिळाल्या. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, प्रकृतीच्या कारणास्तव प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहता, त्यांनी आपल्या निवासस्थानावरूनच ही प्रक्रिया पूर्ण केली. महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारे अर्ज दाखल करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
कायदेशीर तरतुदीचा आधार आणि शपथविधी-
संविधानाच्या कलम ८४ (अ) मधील तरतुदीनुसार, जर एखादा उमेदवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर वैध कारणांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल, तर विहित नमुन्यात शपथपत्र सादर करणे अनिवार्य असते. १९६८ मधील ‘पशुपतीनाथ विरुद्ध हरिहर प्रसाद सिंग’ या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत ही प्रक्रिया राबवण्यात आली. जे. जे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरवसे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची रीतसर शपथ घेतली. त्यानंतर, पवारांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी विधिमंडळात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. खबरदारीचा उपाय म्हणून पवारांनी पक्षीय आणि अपक्ष असे दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा-
राज्यसभेच्या रिक्त असलेल्या सात जागांसाठी केवळ सातच अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सत्ताधारी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने चार, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एक आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाने एक असे एकूण सहा अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांनी आपला एकमेव अर्ज सादर केला आहे. सुरुवातीला शिंदे गटाकडून दुसरा उमेदवार दिला जाण्याची चर्चा होती, मात्र अखेर ज्योती वाघमारे यांनीच अर्ज भरला आणि रोहित टिळक यांचा अर्ज दाखल झाला नाही, ज्यामुळे निवडणुकीतील रंगत संपुष्टात आली आहे.
अर्जांमधील तांत्रिक खबरदारी-
निवडणूक प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये, यासाठी प्रमुख उमेदवारांनी विशेष काळजी घेतली आहे. शरद पवार यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनीही प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. एखादा अर्ज काही त्रुटींमुळे बाद झाला तरी दुसरा अर्ज वैध ठरावा, या हेतूने ही खबरदारी घेण्यात आली आहे. शरद पवार यांच्या अनुपस्थितीत पार पडलेली ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.











