SC & Shivsena Symbol – शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने (supreme court)आज पुन्हा एकदा पुढे ढकलली. आता दिवाळीनंतरच 12 नोव्हेंबरला सविस्तर सुनावणी होणार आहे. सशस्त्र दलाशी संबंधित एका प्रकरणावर विस्तृत सुनावणी होती त्यामुळे न्यायमूर्तींकडे कमी वेळ होता. त्यात शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवादासाठी तब्बल 3 दिवस मागितले. तर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद केवळ 45 मिनिटांचा असल्याचे स्पष्ट केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हवाला देत तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही केली. मात्र कोर्टाने पुढची तारीख देत 12 डिसेंबरपासून सुनावणी सुरू करून 1-2 दिवसांत पूर्ण करू, असे सांगितले.
आजच्या सुनावणीनंतर शिंदे गटाची भूमिका ही तारीख पे तारीख घेत वेळकाढूपणाची असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे 12 डिसेंबरला तरी सुनावणी सुरू होऊन पूर्ण होणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्य कांत, न्या. उज्ज्वल भुयान आणि न्या. एन. के. सिंह यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी झाली.
उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. दुसरीकडे शिंदे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतोगी होते. सुरुवातीलाच न्यायालयाने आपल्याकडे वेळ कमी असल्याचे सांगून दोन्ही गटांना किती वेळ हवा आहे हे विचारले . यावर शिंदे गटाने आपल्याला युक्तिवादासाठी 3 दिवस हवे असल्याचे सांगितले. ठाकरेंतर्फे सिब्बल यांनी म्हटले की, आम्हाला 45 मिनिटे पुरेशी आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे कृपया लवकरात लवकर सुनावणी घ्यावी. यावर शिंदेंतर्फे मुकुल रोहतोगी यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरमध्येही सुनावणी घेतली तरी चालेल, असे सांगितले. यानंतर न्या. सूर्य कांत यांनी येत्या 12 नोव्हेंबरला सुनावणी घेऊ, असे सांगितले.
आजच्या सुनावणीवेळी सिब्बल यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळून लावण्याच्या याचिकेवरही सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी वेगळ्या पीठासमोर सुरू आहे. त्यामुळे एकत्रित सुनावणी हवी असेल, तर सिब्बल यांनी सरन्यायाधीशांकडून तशी परवानगी घ्यावी, अशी सूचना केली.
आजच्या सुनावणीला उपस्थित असलेले वकील असीम सरोदे यांनी सांगितले की, शिवसेना वादावर अंतिम सुनावणीसाठी आज तारीख निश्चित झाली होती. पण न्यायमूर्तींना इतर काही प्रकरणातील प्रलंबित सुनावण्या पूर्ण करायच्या आहेत. त्यावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सविस्तर सुनावणीसाठी नवी तारीख देण्याची मागणी करण्यात आली.
शिंदे गटाकडून युक्तिवादासाठी कमीत कमी 3 दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावरूनच 12 नोव्हेंबर तारीख मिळाली आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवादासाठी आपल्याला 45 मिनिटे हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने 1-2 दिवसांत सुनावणी पूर्ण होईल, असे नमूद केले. सरोदे यांनी सुनावणीआधी शिंदे गट वेळकाढूपणा करण्याची शक्यता वर्तवली होती.
21 जून 2022 या दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना आमचीच असे सांगितले. 16 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले होते. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आयोगाचा हा निर्णय बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. याच प्रकरणातील प्राथमिक युक्तिवाद पूर्ण झाला असून आता अंतिम सुनावणी होणार आहे. विशेष बाब म्हणजे, विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई हे येत्या 23 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर सूर्य कांत हे नवे सरन्यायाधीश होतील. त्यामुळे सूर्य कांत हे सरन्यायाधीश झाल्यानंतरच या प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
गौतमी पाटीलने अपघातानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया..रिक्षाचालकांच्या कुटुंबियांना भेटणार नाही
बिग बॉस शो मध्येच बंद..स्पर्धकांचं काय झाल??
कांतारा चॅप्टर 1 च्या निर्मात्यांने केल चाहत्यांना आवाहन; म्हणाला त्यांच्या भावना दुखावल्या जातील