Home / महाराष्ट्र / Shivsena :भाजपा-शिवसेनेत फोडाफोडी सुरूच! दोन्ही पक्षांनी तोडगा साफ धुडकावला

Shivsena :भाजपा-शिवसेनेत फोडाफोडी सुरूच! दोन्ही पक्षांनी तोडगा साफ धुडकावला

Shivsena – नेते, पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीवरून भाजपा -शिंदेसेना (ShivSena) यांच्यात नाराजीनाट्य घडल्यानंतर एकमेकांच्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असा तोडगा मुख्यमंत्र्यांच्या...

By: Team Navakal
Shivsena
Social + WhatsApp CTA

Shivsena – नेते,  पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीवरून भाजपा -शिंदेसेना (ShivSena) यांच्यात नाराजीनाट्य घडल्यानंतर एकमेकांच्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असा तोडगा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निघाला होता. मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षांकडून फोडाफोडीचा उद्योग सुरूच राहिला आहे. काल सायंकाळी जळगावच्या जामनेरमध्ये भाजपा मंत्री गिरीश महाजनांनी  शिंदेंच्या दोन उमेदवारांनाच पक्षात घेतले, तर आज शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत भाजपा उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावत आपल्या पक्षात प्रवेश दिला. विशेष म्हणजे, काल भाजपाच्या फोडाफोडीचीच तक्रार घेऊन उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. मात्र याबाबतीत भाजपाचे पक्षनेतृत्वही राज्यातील नेत्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी काल सायंकाळी जामनेरमध्ये शिंदे गटाला झटका दिला. शिंदे गटाचे उमेदवार मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणे यांना भाजपामध्ये घेऊन माघार घ्यायला लावली. यामुळे भाजपाचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले. तसेच शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनाही महाजनांनी फोडले. एकनाथ शिंदे बंड करून गुवाहाटीला गेले होते, तेव्हा महाजन हेच बंडखोर सेना आमदारांची काळजी घेण्यासाठी सोबत होते दुसरीकडे, आज हिंगोलीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपा उमेदवार भास्कर बांगर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावून शिवसेनेत प्रवेश दिला. शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना पाठिंबा जाहीर केला. बांगर हे बंडावेळी शिंदे गटात सर्वांत शेवटी सामील झाले होते.

मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीतला तोडगा न पटल्याने एकनाथ शिंदे यांनी काल सायंकाळी दिल्ली गाठली. गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन दिल्लीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तासभर चाललेल्या बैठकीत कल्याण-डोंबिवलीसह अनेक भागांत भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ‌‘ऑपरेशन लोटस‌’ राबवले जात असल्याचा आरोप शिंदेंनी केला. चव्हाण हे मोठी रक्कम देऊन आपले माजी नगरसेवक फोडून त्यांना भाजपामध्ये प्रवेश देत आहेत आणि शिवसेनेचे नुकसान करत आहेत, अशी तक्रार केल्याचे समजते. यासोबतच उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवर घेतल्याबद्दलही एकनाथ शिंदेंनी शहांकडे नाराजी व्यक्त केली. आपलीच मूळ शिवसेना असताना ठाकरे यांना समितीवर घेण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर अमित शहा यांनी, ‌‘रमला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. माझे या संपूर्ण गोष्टींवर लक्ष आहे‌’ असे आश्वासन दिल्याचे कळते.

यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदेंनी, मी रडणारा नाही, तर लढणारा आहे. नाराजीचा विषय तिथेच मिटला, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच शिंदेंनी महायुतीतच फोडाफोडी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश आपल्या पक्षाच्या नेत्यांना दिल्याचे सांगितले होते. मात्र या बैठकीनंतर भाजपा सुत्रांनी सांगितले की, भाजपा हायकमांड प्रदेश भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आरोप-प्रत्यारोप होतच राहणार, राज्यात भाजपाची घोडदौड सुरू राहिली पाहिजे. पक्षबांधणीचे काम सुरूच ठेवा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाला क्रमांक एकचा पक्ष करा, अशा सूचना हायकमांडकडून देण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज अमित शहांना दिल्लीला भेटीला जाण्यावरून एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. आज मुंबई महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार असेल तर फंड देण्यासाठी मुठी आवळल्या जातात. आता त्यांच्यात एकमेकांच्या नसा आवळल्या जात आहेत. आजच आपण वाचले कुणीतरी दिल्लीला गेले होते, बाबा मला मारले म्हणून. लाचारी का? तर त्यांना चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती. भाजपा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र शिंदे नाराज असल्याच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचे स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्र 51 टक्के मतांनी जिंकण्यासाठी महायुती मजबूत ठेवत विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला बळ देण्याची शिंदेंची भूमिका असल्याचे बावनकुळे म्हणाले.

————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा – 

नागपूरात दाट वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याला पकडण्यासाठी पोलीस आणि वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन

ताम्हिणी घाटात थार ५०० फूट दरीत कोसळली ! चौघांचा मृत्यू

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या