Dharmendra Passes Away -‘शोले’ या अविस्मरणीय चित्रपटात अजरामर झालेली विरूची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra)यांचे आज वयाच्या 89 व्या वर्षी जुहू येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अमिताभ बच्चनपासून बॉलिवूडमधील अनेक कलावंत आणि असंख्य चाहते उपस्थित होते.
आज सकाळी साडेनऊ वाजता धर्मेंद्र यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या बंगल्यात दुपारी पावणेदोनच्या सुमारास एक अॅम्ब्युलन्स आली.साधारणतः 20-25 मिनिटांनंतर अॅम्ब्युलन्स बंगल्याच्या बाहेर पडली. त्यावेळी बंगल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चाहत्यांनी बंगल्याबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मात्र धर्मेंद्र यांना नेमके कुठे नेण्यात येत आहे, याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिली नव्हती. काही वेळाने धर्मेंद्र यांचे निधन झाले असून, जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, असे समजले. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा सनी देओल याने त्यांना मुखाग्नी दिला. धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीसाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, त्यांचे पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेता सलमान खान, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान, अभिनेता संजय दत्त, धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि त्यांची मुले अभिनेते सनी देओल,बॉबी देओल आणि ईशा देओल व हेमा मालिनी आदि उपस्थित होते. धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून नाजूक बनली होती. त्यांना काही दिवसांपूर्वी ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 12 नोव्हेंबर रोजी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हापासून त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरातच वैद्यकीय उपचार सुरू होते.
अखेरचा चित्रपट ‘इक्कीस’
25 डिसेंबरला प्रदर्शित होणार
धर्मेंद्र यांचा अखेरचा चित्रपट ‘इक्कीस’ 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट श्रीराम राघव यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाचे कथानक 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य दाखविणारे भारताचे परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा अरुण खेत्रपालची भूमिका साकारत आहे. तर
धर्मेंद्र यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे.
चांगला मित्र हरपला
गडकरींची प्रतिक्रिया
धर्मेंद्र हे चतुरस्र अभिनेते तर होतेच, पण त्याच बरोबर ते एक चांगला माणूस, उमदे व्यक्तिमत्व होते. धर्मेंद्र यांच्या कुटुंबाशी माझे जवळचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने मी एक चांगला मित्र, एक उमदा माणूस गमावला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे नितीन गडकरी म्हणाले.
एका युगाचा अंत झाला
करण जोहर यांची पोस्ट
धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त कळताच हिंदी सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला. निर्माता -दिग्दर्शक करण जोहर यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट करून एका युगाचा अंत झाला, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. धर्मेंद्र यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे फार मोठे नुकसान झाले आहे. ते जरी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी ते आमच्या कायम स्मरणात राहतील, असे करण जोहरने पोस्टमध्ये म्हटले आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण होणार?
हिंदूंनी २ मुले जन्माला घातली तरच धर्म टिकेल ! नरेंद्र महाराजांचे आवाहन









