Home / महाराष्ट्र / Shree Swami Samarth : ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’: श्री स्वामी समर्थ महाराज यांचा १७० वा प्रकट दिन उत्साहात साजरा; अक्कलकोटमध्ये भाविकांचा जनसागर

Shree Swami Samarth : ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’: श्री स्वामी समर्थ महाराज यांचा १७० वा प्रकट दिन उत्साहात साजरा; अक्कलकोटमध्ये भाविकांचा जनसागर

Shree Swami Samarth : ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज’ यांचा १७० वा प्रकट दिन आज महाराष्ट्रसह...

By: Team Navakal
Shree Swami Samarth
Social + WhatsApp CTA

Shree Swami Samarth : ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज’ यांचा १७० वा प्रकट दिन आज महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध द्वितीयेच्या पावन मुहूर्तावर साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त स्वामींच्या कर्मभूमीत म्हणजेच अक्कलकोट येथे श्रद्धेचा महाकुंभ भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहाटेपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखाो भाविकांनी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट नगरीत गर्दी केली होती.

अक्कलकोट नगरीत भक्तीचा मळा-
प्रकट दिनाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील ऐतिहासिक वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात पहाटे मंगलमय वातावरणात काकड आरती आणि विशेष महाअभिषेक करण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. स्वामींच्या पादुकांचे पूजन आणि षोडशोपचार पूजा झाल्यानंतर सामूहिक आरती संपन्न झाली. संपूर्ण मंदिर परिसर आणि अक्कलकोटची ग्रामदैवत नगरी ‘श्री स्वामी समर्थ’ या नामघोषाने दुमदुमून गेली होती. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर समिती आणि स्थानिक प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले होते.

यवतमाळ आणि पुरंदरमध्ये धार्मिक उत्सवांची मांदियाळी-
केवळ अक्कलकोटच नव्हे, तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही प्रकट दिनाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यवतमाळ येथील गुरुकृपा नगरी परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात गेल्या आठ दिवसांपासून अखंड नामस्मरण, पारायण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज या उत्सवाची सांगता भव्य पालखी मिरवणुकीने झाली. फुलांनी सजवलेल्या पालखीत स्वामींची प्रतिमा विराजमान करून निघालेल्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सामील झाले होते.

पुरंदर येथील स्वामी समर्थ अनंत मठामध्येही प्रकट दिन सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पहाटेची काकड आरती, विधिवत अभिषेक, दत्तयाग आणि आध्यात्मिक प्रवचनांमुळे मठातील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि भक्तिमय झाले होते. संध्याकाळी निघालेल्या पालखी सोहळ्यात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.

भक्ती अन् सेवाकार्याचा संगम-
प्रकट दिनानिमित्त ठिकठिकाणच्या स्वामी मठांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी आणि गरिबांना अन्नदान असे सामाजिक उपक्रम राबवून स्वामींची सेवा करण्यात आली. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या स्वामींच्या अभयवचनाचा जागर करत लाखो भक्तांनी आपल्या सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या