Solapur Crime News : सोलापूरमधील विजयपूर रस्ता परिसरातील ‘पनाश अपार्टमेंट’ या टोलेजंग इमारतीत गुरुवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीत एकेकाळी अग्रगण्य नाव असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक, ५९ वर्षीय सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी या इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचे आयुष्य संपवले.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सदारंगानी हे गुरुवारी दुपारच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनाने पनाश अपार्टमेंटच्या परिसरात पोहोचले होते. त्यांनी आपली गाडी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली आणि त्यानंतर ते लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांच्या साहाय्याने वरच्या मजल्यांच्या दिशेने गेले. काही वेळाने इमारतीतील रहिवाशांना १७ व्या मजल्याच्या कठड्यावर एक व्यक्ती हात जोडून उभी असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहताच रहिवाशांनी तातडीने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला माहिती दिली.
सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखून तातडीने वरचा मजला गाठला आणि सदारंगानी यांना समजावून सांगत सुरक्षितपणे खाली आणले. मात्र, आत्महत्येचा दृढ निश्चय केलेल्या सदारंगानी यांनी “माझ्या गाडीची चावी वरच राहिली आहे” असा बहाणा केला. सुरक्षारक्षक काही समजण्याच्या आतच ते पुन्हा वेगाने वरच्या मजल्यावर गेले आणि तिथून त्यांनी थेट खाली उडी घेतली. हा थरार इतका वेगवान होता की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. सदारंगानी यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाची विजापूर नाका पोलीस ठाण्यात ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पनाश अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर सुनील सदारंगानी यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण हृदयद्रावक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे. घटनेची भीषणता लक्षात घेता, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या क्रमांकावरून पोलिसांनी तपास केला असता, मृताची ओळख पटली आणि त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) पाठवण्यात आला.
सुनील सदारंगानी हे सोलापूरमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व राजकुमार राठी यांचे जावई होते. ते गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक झाले होते, मात्र चार-पाच दिवसांपूर्वीच ते आपल्या पत्नीसह सोलापूरला आले होते. सोलापूरमध्येच पुन्हा स्थायिक होण्याचा त्यांचा मानस होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा अमेरिकेत वास्तव्यास आहे तर दुसरा मुलगा पुण्यात आपला व्यवसाय सांभाळतो. पित्याच्या निधनाचे वृत्त समजताच अमेरिकेतील मुलगा सोलापूरच्या दिशेने रवाना झाला आहे. सदारंगानी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मोदी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वैभवाचा काळ आणि संघर्षाची किनार-
एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि परिसरात ‘मुलतानी बेकरी’ हे नाव गुणवत्तेचा पर्याय मानले जात असे. सुनील सदारंगानी यांचा या व्यवसायामुळे अनेक नामवंत व्यक्तींशी दांडगा संपर्क होता. मात्र, काळाच्या ओघात काही वर्षांपूर्वी ही बेकरी बंद पडली, ज्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. बेकरी बंद झाल्यानंतर ते पुण्यातील खराडी भागात वास्तव्यास गेले होते. नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून ते मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत होते. या आर्थिक विवंचनेमुळे त्यांना मानसिक नैराश्याने ग्रासले होते, ज्यासाठी त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही सुरू होते.
सुनील सदारंगानी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी ‘पनाश अपार्टमेंट’चीच निवड का केली? आणि त्यांच्या या निर्णयामागे केवळ आर्थिक चणचण होती की आणखी काही कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणे दडली आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विजापूर नाका पोलीस सखोल तपास करत आहेत. एका प्रसिद्ध उद्योजकाच्या अशा दुर्दैवी अंतसामुळे सोलापूरच्या व्यापारी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.









