Home / महाराष्ट्र / Solapur ZP Election Result 2026 : सोलापूर जिल्हा परिषद निकाल: माळशिरसमध्ये ‘मोहिते-पाटील’ आणि ‘जानकर’ गटाला भाजपचा मोठा धक्का

Solapur ZP Election Result 2026 : सोलापूर जिल्हा परिषद निकाल: माळशिरसमध्ये ‘मोहिते-पाटील’ आणि ‘जानकर’ गटाला भाजपचा मोठा धक्का

Solapur ZP Election Result 2026 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत आज अत्यंत धक्कादायक आणि...

By: Team Navakal
Solapur ZP Election Result 2026
Social + WhatsApp CTA

Solapur ZP Election Result 2026 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत आज अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल समोर आले आहेत. माळशिरस या मोहिते-पाटलांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्या गटाला जबरदस्त चुरस दिली आहे. या ‘हाय व्होल्टेज’ राजकीय संघर्षात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करत विजय मिळवला असून, मोहिते-पाटील व जानकर समर्थकांसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

दहिगाव गटात संस्कृती राम सातपुते यांचा विजय-
सर्वात मोठी चुरस दहिगाव जिल्हा परिषद गटात पाहायला मिळाली. येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी विजयश्री खेचून आणली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांचा पराभव केला. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते, कारण येथे दोन दिग्गज राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. संस्कृती सातपुते यांनी मिळवलेला हा विजय भाजपसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. केवळ जिल्हा परिषदच नव्हे, तर दहिगाव गटांतर्गत येणाऱ्या दोन्ही पंचायत समिती जागांवरही भाजपने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे.

मोहिते-पाटलांच्या गडाला खिंडार-
दुसरीकडे, माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा निकाल गुरसाळे गणातून समोर आला आहे. येथे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे निकटवर्तीय अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मोहिते-पाटील यांच्या घरातील आणि विश्वासातील उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे या भागातील त्यांच्या एकहाती सत्तेला भाजपने मोठे खिंडार पाडले असल्याचे बोलले जात आहे.

एकेकाळी मोहिते-पाटील आणि जानकर यांची युती जिल्ह्याच्या राजकारणात वरचढ ठरली होती, मात्र या निवडणुकीत भाजपने अतिशय सूक्ष्म नियोजन करून या बालेकिल्ल्यात ‘कमळ’ फुलवले आहे. विजयी उमेदवार संस्कृती सातपुते आणि भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळत मोठा जल्लोष साजरा केला. या निकालामुळे सोलापूर जिल्ह्याच्या आगामी राजकारणात सत्तासमतोलाची नवीन समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या निवडणुकीत प्रस्थापित आणि उदयोन्मुख नेतृत्वामध्ये झालेल्या अटीतटीच्या संघर्षात अखेर भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटात झालेली ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील नव्हती, तर ती जिल्ह्याच्या राजकीय वर्चस्वाची ‘लढाई’ मानली जात होती. येथे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी विजय संपादन करून विजयाचा गुलाल उधळला आहे.

या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे माळशिरसचे दोन दिग्गज नेते – विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि विद्यमान आमदार उत्तमराव जानकर-यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षासमोर मोठे आव्हान उभे केले होते. या युतीने भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी कंबर कसली होती. या पार्श्वभूमीवर राम सातपुते यांनी आपली पत्नी संस्कृती सातपुते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. संस्कृती सातपुते यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांच्याशी होती. दोन तरुण चेहऱ्यांमधील या ‘बिग फाईट’कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच या गटात चुरस पाहायला मिळाली, मात्र जसजशा फेऱ्या पूर्ण होत गेल्या, तसतशी संस्कृती सातपुते यांनी निर्णायक आघाडी घेतली. अखेर, मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपला कौल देत जीवन जानकर यांचा पराभव केला. माळशिरस तालुक्यात खासदार आणि आमदारांची ताकद एकवटलेली असतानाही, भाजपने या बालेकिल्ल्यात मिळवलेला विजय हा चर्चेचा विषय ठरला आहे. संस्कृती सातपुते यांच्या या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, हा निकाल माळशिरसच्या आगामी राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

माळशिरसमध्ये भावनिक राजकारणाची किनार: टीकेला न जुमानता संस्कृती सातपुते यांचा विजय..
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपच झाले नाहीत, तर या संघर्षाला एक भावनिक आणि संवेदनशील किनारही लाभली होती. दहिगाव गटातून विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार संस्कृती सातपुते यांनी आपल्या अवघ्या चार महिन्यांच्या कन्येला सोबत घेऊन केलेला प्रचार या संपूर्ण निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला. या कृतीमुळे एकीकडे त्यांना मातृत्वाच्या नात्याने महिला वर्गाची प्रचंड सहानुभूती लाभली, तर दुसरीकडे विरोधकांनी यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

निवडणूक प्रचारादरम्यान संस्कृती सातपुते आपल्या तान्हुल्या मुलीला कडेवर घेऊन घराघरांत पोहोचत होत्या. दहिगाव येथे आयोजित पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जाहीर सभेतही हे चिमुकले बाळ बराच वेळ पालकमंत्र्यांच्या आणि त्यानंतर वडील राम सातपुते यांच्या कुशीत खेळताना दिसले. या दृश्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले होते. यावरून विरोधकांनी ही ‘राजकीय सहानुभूती मिळवण्याची खेळी’ असल्याचे म्हणत सातपुते यांच्यावर टीका केली. एका लहान जिवाला अशा प्रकारे राजकीय व्यासपीठावर आणणे चुकीचे असल्याची चर्चा सोशल मीडियातून रंगली होती.

आपल्या पत्नी आणि चिमुरड्या मुलीवर होत असलेल्या या वैयक्तिक टीकेमुळे माजी आमदार राम सातपुते अत्यंत व्यथित आणि संतप्त झाले होते. आपल्या प्रचारसभेतील भाषणातून त्यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला. “तुमचा राजकीय संघर्ष माझ्याशी आहे, तुमची वैयक्तिक दुश्मनी माझ्याशी असू शकते, मग माझ्या चार महिन्यांच्या निष्पाप बाळाला या वादात ओढण्याचे कारण काय?” असा टोकदार सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. “लहान बाळावर टीका करणाऱ्यांचे देव कधीच भलं करणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला होता.

या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एका बाजूला आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर आणि दुसऱ्या बाजूला राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते, असा हा थेट सामना होता. विरोधकांनी केलेल्या वैयक्तिक टीकेला मतदारांनी आपल्या मतदानातून चोख उत्तर दिले आहे. अखेर, भावनिक आव्हान आणि राजकीय संघर्षावर मात करत माजी आमदार राम सातपुते यांनी दहिगाव गटात भाजपचे ‘कमळ’ फुलवले असून, संस्कृती सातपुते यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. हा निकाल केवळ राजकीय विजय नसून, वैयक्तिक टीकेला जनतेने दिलेली चपराक मानली जात आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या