Sunetra Pawar DCM Oath : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली असून, आज सायंकाळी त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.
सुनेत्रा पवार यांच्या निवडीसाठी आज विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार, मंत्री आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी, पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव विधीमंडळ गटनेते पदासाठी मांडला. या प्रस्तावाला पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. सर्व आमदारांनी या प्रस्तावाचे स्वागत केल्याने सुनेत्रा पवार यांची निवड एकमताने झाली. आता अजित पवारांनंतर पक्षाची आणि सत्तेतील महत्त्वाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर विसावली आहे.
राजभवन येथे सायंकाळी शपथविधी सोहळा-
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा आज, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राजभवन येथे पार पडणार आहे. सायंकाळी ५ ते ५:१२ या शुभ मुहूर्तावर हा सोहळा संपन्न होईल. राज्याचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत हे सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. विशेष म्हणजे, आजच्या या सोहळ्यात केवळ सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी होणार असून, अन्य कोणाचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
खातेवाटप आणि जबाबदारी-
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ खात्यासारखी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी होती. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवतानाच त्यांच्याकडे काही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारीही दिली जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांना ‘राज्य उत्पादन शुल्क’ आणि ‘क्रीडा व युवक कल्याण’ विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तथापि, अर्थ खाते सध्या त्यांच्याकडे दिले जाणार नसून, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या खात्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अर्थ खात्याचा कारभार तात्पुरत्या स्वरूपात इतर मंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे राहू शकतो.
ऐतिहासिक क्षण आणि महिला नेतृत्व-
सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. हा क्षण राज्याच्या राजकारणात महिलांच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक मानला जात आहे. कौटुंबिक दुःख बाजूला सारून राज्याच्या हितासाठी आणि पक्षाच्या मजबुतीसाठी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. बारामतीमधील त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक कामाचा अनुभव प्रशासकीय कामकाजात मोलाचा ठरेल, असा विश्वास महायुतीमधील नेत्यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा – Sunetra Pawar : महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; जाणून घ्या सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास












