Sunetra Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आज दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या स्वतंत्र पहिल्या बैठका त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. अजित पवारांच्या अनुपस्थितीत होत असलेल्या या बैठकींना भावनिक छटा लाभली.
पुणे आणि बीड येथे विभागीय कार्यालयात बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. सुनेत्रा पवार मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्या. दोन्ही जिल्ह्यांतील आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यांच्या विकास आराखड्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “अजित पवारांची बीड जिल्ह्याविषयी प्रचंड ओढ होती. त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी एकदिलाने आणि प्रामाणिकपणे काम करावे. विकासाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
पुण्यातील बैठकीनंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, अजित पवार नसताना झालेली ही पहिली बैठक असल्याने सर्वांना त्यांची उणीव जाणवली. शहरी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी निधीचे संतुलित वाटप कसे करावे, यावर विचारमंथन झाले. विशेषतः सौरऊर्जा प्रकल्प आणि आदिवासी भागांसाठी अधिक निधी देण्याचा मुद्दा पुढे आला.बैठकीत मुख्यमंत्रीांकडे १ हजार ६०० कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांनी सुरू केलेल्या कामांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, यावरही सर्वांचे एकमत झाले.










